कडुलिंबाची दहा झाडे लाव, मध्य प्रदेश हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला दिले आदेश

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने खुनाच्या एका प्रकरणात दोषी ठरवलेल्या व्यक्तीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली. कारण या व्यक्तीने दहा वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला आहे. न्यायालयाने आरोपीला हिंसेच्या विचाराला रोखण्यासाठी त्याला दहा कडुलिंबाची झाडे लावण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती आनंद पाठक आणि न्यायमूर्ती पुष्पेंद्र यादव यांच्या खंडपीठाने म्हटले की, हे निर्देश एका उपक्रमाचा भाग आहेत, ज्यामुळे ‘निसर्गाशी सर्जनशीलता आणि सामंजस्याच्या माध्यमातून हिंसा व दुष्टतेच्या विचारांना आळा घालता येईल.’ न्यायालयाने नमूद केले की सध्या, करुणा, सेवा, प्रेम आणि दया यांसारख्या मानवी गुणांचा विकार होणे गरजेचे आहे. हा प्रयत्न फक्त एक झाड लावण्याबाबत नाही, तर एका विचाराचे बीज पेरण्याबाबत आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.

आरोपी महेश शर्माला खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याने 2021 मधील कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देऊन शिक्षेची स्थगिती आणि जामीन मागितला होता.

न्यायालयाने अर्जदाराला 10 झाडे, फळझाडे, कडुलिंब किंवा पिंपळाची झाडे लावण्याचा आदेश दिला आणि सांगितले की, त्या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल. न्यायालयाने त्याला सुटकेच्या 30 दिवसांच्या आत झाडांच्या छायाचित्रांचा पुरावा सादर करण्यास सांगितले. अर्जदाराला 6-8 फूट उंचीची रोपे लावली पाहिजेत, असे सांगितले.