
पहिल्या डावातील 151 धावांच्या पिछाडीनंतरही गतविजेत्या मध्य प्रदेशने आवेश खानची दमदार गोलंदाजी आणि यश दुबे-रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर आंध्रचे 245 धावांचे आव्हान 5 फलंदाजांच्या मोबदल्यात आपल्या घरच्याच खेळपट्टीवर विजयी झेंडा रोवत सलग दुसऱयांदा उपांत्य फेरी गाठली. तसेच कर्नाटक आणि बंगालने अपेक्षेप्रमाणे चौथ्या दिवशी चहापानापूर्वीच विजय मिळवत रणजी करंडकाच्या अंतिम चार संघांत स्थान मिळविले.
कर्नाटकचे उपांत्य फेरीवर शिक्कामोर्तब
490 धावांची आघाडी मिळवून कर्नाटकने तिसऱयाच दिवशी आपला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. तर आज विजयकुमार विशाक, एम. वेंकटेश आणि श्रेयस गोपाळने उत्तराखंडच्या फलंदाजांना धडाधड माघारी पाठवत चहापानापूर्वीच त्यांचा कार्यभार संपवला. कालच्या 3 बाद 106 वरून उत्तराखंडचा दुसरा डाव 209 धावांवरच संपला आणि कर्नाटकने एक डाव 281 धावांच्या दणदणीत विजयाची नोंद केली. फलंदाजीत दीडशतकी खेळी करणाऱया श्रेयस गोपाळने 26 धावांत 3 विकेट मिळवत उत्तराखंडचा डाव लवकर संपुष्टात आणला. गेले आठ वर्षे रणजी जेतेपदापासून दूर असलेला कर्नाटकचा संघ नवव्यांदा चॅम्पियन होण्याचे प्रयत्न करणार आहे.
मध्य प्रदेशचा धक्कादायक विजय
काल आवेश खानच्या भेदक गोलंदाजीवर आंध्रचा दुसरा डाव 93 धावांत गुंडाळून मध्य प्रदेशने खळबळ माजवली होती. पहिल्या डावातील आघाडीमुळे आंध्रला मध्य प्रदेशसमोर 245 धावांचे आव्हान ठेवता आले, काल बिनबाद 58 धावा करणाऱया मध्य प्रदेशला दिवसाच्या दुसऱयाच चेंडूवर धक्का बसला, पण त्यानंतर यश दुबे (58) आणि शुभम शर्माने (40) 62 धावांची भागी रचून दिली. मग रजत पाटीदारने 76 चेंडूंत 55 धावा फटकावताना मध्य प्रदेशचा विजय निश्चित केला. मध्य प्रदेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार खेळ केल्यामुळे आंध्रच्या गोलंदाजांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधीच मिळू दिली नाही.
बंगालने औपचारिकता पूर्ण केली
बंगालने कालच आपला विजय निश्चित केला होता, तर आज त्याची औपचारिकता पूर्ण केली. 7 बाद 162 अशा स्थितीत असलेला झारखंडचा संघ 221 धावांवर संपला आणि पहिल्या डावात 155 धावांची आघाडी मिळविणाऱया बंगालसमोर केवळ 67 धावांचे माफक लक्ष्य उरले, जे त्यांच्या अभिमन्यू ईश्वरन आणि सुदीप घरामी या दुसऱया जोडीने 13 व्या षटकातच पूर्ण केले. सामन्यात 108 धावांत 6 विकेट टिपणारा बंगालचा आकाश दीप विजयाचा शिल्पकार ठरला. आता बंगालची गाठ सौराष्ट्र-पंजाब लढतीतील विजेत्या संघाशी पडेल.
संक्षिप्त धावफलक
उत्तराखंड विरुद्ध कर्नाटक
निकाल – कर्नाटक डाव आणि 281 धावांनी विजयी
z उत्तराखंड (प.डाव) ः 55.4 षटकांत सर्वबाद 116 z कर्नाटक (प. डाव) ः 162.5 षटकांत सर्वबाद 606 z उत्तराखंड (दु.डाव) – 73.4 षटकांत सर्वबाद 209 (जीवनज्योत सिंग 24, दिक्षांशु नेगी 29, स्वप्निल सिंग 51, आदित्य तरे 28 ; विद्वत कावेरप्पा 15-7-30-2, विजय विशाक 20-4-55-3, एम वेंकटेश 14-2-44-2, श्रेयस गोपाळ 12.4-1-26-3)
झारखंड विरुद्ध बंगाल
बंगाल 9 विकेटनी विजयी
z झारखंड (प.डाव) ः 66.2 षटकांत सर्वबाद 173 z बंगाल (प.डाव) ः 108 षटकांत सर्वबाद 328 z झारखंड (दु.डाव) ः 63.5 षटकांत सर्वबाद 221 (आर्यमन सेन 64, अनुकुल रॉय 40, विराट सिंग 29, सुप्रियो चकबर्ती 41 ; आकाश दीप 14-3-46-2, आकाश घटक 7.5-1-21-3, शाहबाज अहमद 16-3-45-2) z बंगाल (दु. डाव) – 12.4 षटकांत 1 बाद 69 ( अभिमन्यू ईश्वरन ना. 28, सुदीप घरामी 26)
सौराष्ट्र विरुद्ध पंजाब
z सौराष्ट्र (प.डाव) ः 87 षटकांत सर्वबाद 303 z पंजाब (प.डाव) ः 124.3 षटकांत सर्वबाद 431 z सौराष्ट्र (दु.डाव) – 120-1 षटकांत सर्वबाद 379 (स्नेल पटेल 33, शेल्डन जॅक्सन 21, अर्पित वसावडा 77, चिराग जानी 77, प्रेरक मांकड 88, पार्थ भुत ; विनय चौधरी 49.1-11-179-7) z पंजाब (दु. डाव) – 23 षटकांत 2 बाद 52 (प्रभसिमरन 22, पुखराज मान खेळत आहे 17 ; पार्थ भुत 8-3-30-2)
सौराष्ट्र–पंजाबमध्ये चुरस
पहिल्या डावात 128 धावांनी पिछाडीवर असूनही सौराष्ट्रने दुसऱया डावात अर्पित वसावडा (77), चिराग जानी (77), प्रेरक मांकड (88) आणि पार्थ भुत (51) यांच्या दमदार खेळामुळे 379 अशी दणदणीत मजल मारत सामन्यात पुनरागमन करण्याचा करिश्मा केला. कालच्या 4 बाद 138 धावसंख्येत सौराष्ट्रने 241 धावांची भर घातली. वसावडा-जानीने पाचव्या विकेटसाठी 140, तर मांकड-भुतने आठव्या विकेटसाठी 92 धावांची भागी रचत सामन्याचा सारा नूरच पालटवून टाकला. सौराष्ट्रने पंजाबसमोर 252 धावांचे जबर आव्हान ठेवले असून दिवसअखेर पार्थ भुतने सलामीवीरांना बाद करीत सामन्यात रंजकता आणली आहे. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असून पंजाबला विजयासाठी 200 धावांची गरज आहे, तर सौराष्ट्रला आणखी 8 विकेटस् टिपायच्या आहेत.


























































