नोकरी गेल्यामुळे मंदिरात जाऊन दर्शन घेतले, नंतर स्वतःवर वार करून तरुणाने जीवन संपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरी गेल्यामुळे नैराश्यातून मध्यप्रदेशातील तरुणाने पुण्यातील साने गुरूजी वसाहत परिसरातील साई बाबा मंदिरात जाऊन दर्शन घेत स्वतःवर चाकूने वार करून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली. राजेंद्र रमेश महाजन (वय २२, रा. पुणे, मुळ. बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

राजेंद्र मूळचा मध्य प्रदेशातील होता. कामानिमित्त तो पुण्यात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे काम गेले होते. त्यामुळे नैराश्याने तो गुरूवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी परिसरातील साने गुरूजी वसाहत परिसरातील साईबाबांच्या मंदिरात आला. मंदिरात नतमस्तक होत त्याने आणलेला हार अर्पण केला. त्यानंतर बाहेर येऊन खिशात आणलेला चाकू स्वतः पोटात खुपसून घेतल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याची माहिती मिळताच दत्तवाडी पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान राजेंद्रचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. त्याच्या मोबाईलवरून पोलिसांनी घटनेची माहिती नातेवाईकांना दिली. मुलाची वाट पहात असलेल्या नातेवाईकांना घटनेनंतर धक्काच बसला. मध्य प्रदेशातून नातेवाईकांनी पुण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर राजेंद्रचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे माहिती पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांनी दिली.

घटनेपूर्वी आई वडिलांसोबत मारल्या गप्पा

राजेंद्र बीएससीच्या तृत्तीय वर्षात शिक्षण घेत होता. परंतु, काही महिन्यांपुर्वी तो पुण्यात नोकरीनिमित्त आला होता. रांजणगाव परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी देखील करत होता. त्याचे आई-वडिल गावी शेती करून उपजिवीका भागवितात. राजेंद्रचे नोकरीत मन रमत नव्हते. त्याने गुरूवारी दिवसभर मित्र, मैत्रिणी, आई-वडिल आणि नातेवाईकांना फोन करून गप्पा मारल्या. आई-वडिलांना फोनवर मी नोकरी सोडली असून परत घरी येणार असल्याचे सांगितले. आई-वडिलांनी त्याला शेती कर आणि राहिलेले शिक्षण पुर्ण करण्याचा सल्ला दिला होता.मात्र राजेंद्रने स्वतःला संपवले आहे.