
मध्य प्रदेशातील इंदूर-बैतूल राष्ट्रीय महामार्गावरील मोखापीपल्या परिसरात रविवारी एक भीषण अपघात घडला. खातेगाव येथून येणारी एक कार अनियंत्रित होऊन कालीसिंध नदीवरील ब्रिटिशकालीन अरुंद पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात कारमधील चार पैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
कारमध्ये चंदिगडचे रहिवासी उच्य तेवन, इंदूरचे रहिवासी आनंदराज, अमृतसरचे रहिवासी ओ. पी. आणि जयपूरचे रहिवासी इलैयाराजा होते. या अपघातात ओ. पी. आणि आनंद यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना स्थानिक ग्रामस्थांनी सांगितल्यानुसार, कार ज्या ठिकाणी नदीत कोसळली, तिथे नदीची खोली 8 ते 10 फूट होती.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अशा धोकादायक ठिकाणी रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीची मागणी स्थानिकांनी केली आहे.