क्रूरतेचा कळस; नोकरी वाचवण्यासाठी शिक्षिकानं नवजात बाळाला जिवंत गाडलं, धक्कादायक कारण आलं समोर…

मध्य प्रदेशात एका दाम्पत्याने क्रूरतेचा कळसच गाठला आहे. नोकरी वाचविण्यासाठी एका शिक्षकाने आपल्या सहा दिवसाच्या बाळाला दगडांखाली जिवंत गाडल्याची घटना समोर आली आहे. या क्रूरतेत त्याची पत्नीही सहभागी होती. त्यांच्या या कृत्याने संगळीकडे संतापाचे वातावरण पसरले आहे.

बबलू डांडोलिया असे त्या शिक्षकाचे नाव असून तो सिंधोली गावचा रहिवासी आहे. अमरवाडाच्या प्राथमिक विद्यालयात तो शिक्षक आहे. बबलू याला आधीच आठ, सहा आणि चार वर्षांची तीन अपत्ये आहेत. त्याचे तिसरे अपत्य पालनपोषणासाठी दुसऱ्याला दिले आहे. बबलू आणि त्याच्या पत्नीने चौथ्यावेळी गरोदर असल्याची माहिती लपवली आणि 23 सप्टेंबरला तिने घरातच प्रसूती करुन घेतली. मात्र त्यादरम्यान पत्नीची तब्येत बिघडल्याने तिला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर, 27 सप्टेंबर रोजी या जोडप्याने नवजात बाळाला जंगलात दगडांखाली जिवंत गाडले आहे. नवजात बाळ रात्रभर थंडी आणि पावसात तिथेच पडले होते. गावकऱ्यांना नवजात बाळ सापडले आणि त्यांनी पोलिसांना कळवले.

मुंग्या आणि कीटकांमुळे बाळाच्या  शरीरावर संसर्ग होण्याचा धोका असल्याने आणि रात्री थंडी असल्याने नवजात बाळाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन जोडप्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.

मध्य प्रदेशात दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी सेवेतून काढून टाकण्याची शिक्षा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना आरोपीच्या तिसऱ्या मुलाबद्दल माहिती नाही, मात्र तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.