आगळं-वेगळं – करोडपती शेतकरी

>> मंगल गोगटे

वरचं शीर्षकच चुकल्यासारखं वाटतंय ना? कुणाच्याही नजरेस पडलं तरी त्याला तसंच वाटेल अशी परिस्थिती आहे, पण शेती हे एक जीवनावश्यक कार्य आहे, हे नाकारून चालणार नाही. बाकी सर्व उद्योगांचं महत्त्व कितीही असलं तरीही शेती हे सगळय़ात जास्त महत्त्वाचं उत्पादन क्षेत्र आहे हे अगदी विशेष. कारण हा एकमेव उद्योग आहे, जिथे पेरल्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात उगवतं. निर्मितीचं खरं समाधान इथेच तर मिळतं. हे समाधान मिळवता मिळवता श्रीमंती वाटय़ाला येतेच असं नाही. अनेक वेळेला तर शेतकरी हवालदिल झालेला बघायला मिळतो. त्याचं कुटुंब गरिबीत दिवस काढताना दिसतं.

अनेकदा शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. त्याचे कुटुंब उघड्यावर पडते, त्यांची वाताहत होते. मग बातमीदार जागे होतात. त्याबद्दल भरभरून लिहितात. सरकारदरबारी त्याची दखल घेतली जाते. आपल्यासारखी माणसं हे सगळं मनाला, जिवाला लावून घेताना दिसतात. कुणीतरी उपोषणाला बसतो. कुणीतरी ‘माणूस’ जागा होताना दिसतो. कधी शेतकऱ्याला थोडीफार मदतही मिळते यातून, पण सगळय़ा गोष्टींप्रमाणे याही गोष्टीला अपवाद आहे एक गाव. शिमल्याजवळचं एक गाव जे फक्त शेतकऱ्यांचं आहे आणि याचं नाव आहे दशोली. शिमल्यापासून सुमारे 90 किमीवर असलेल्या या गावातील शेतकऱ्यांची जीवनशैली अगदी श्रीमंत आहे. यांची घरं आलिशान आहेत आणि ते वापरत असलेली वाहनं महागडी आहेत. मडावग येथील शेतकऱ्यांनी हे शेतीतून मिळवलं आहे. इथल्या 230 कुटुंबांचं नशीब शेतीमुळेच पालटलं आहे. या प्रत्येक कुटुंबाचं उत्पन्न दर वर्षाला 35 ते 80 लाख एवढं आहे. इथला प्रत्येक शेतकरी करोडपती आहे आणि आता हे आशियातील सर्वात श्रीमंत शेतीप्रधान गाव आहे. इथे दर वर्षाला 175 कोटी रुपयांची सफरचंद विकली जातात. यातील बहुतेकशी सफरचंद निर्यात केली जातात.

मडावग येथील शेतकरी पूर्वी बटाटे पिकवत असत. 1953-54 मध्ये गावातील चइया राम मेहता यांनी सफरचंदाची बाग लावली. त्यांनी गावातील इतर लोकांनाही सफरचंदाची शेती करण्यास प्रोत्साहन दिले. हळूहळू सर्वांनी इथे सफरचंदाची लागवड करायला सुरुवात केली. सन 2000 नंतर मडावगच्या सफरचंदाला देशात ओळख मिळू लागली. आता येथील बागायतदार ‘हाय डेन्सिटी

‘प्लॅण्टेशन’सारख्या आधुनिक तंत्राने सफरचंदाची लागवड करतात. मडावगच्या सफरचंदाचा दर्जा उत्कृष्ट आहे. त्यामुळे ती नेहमीच चढय़ा दराने विकली जातात.

मडावगच्या आधी शिमला जिह्यातील निसर्गसुंदर किआरी गाव आशियातील दहा सर्वात श्रीमंत गावांपैकी एक होते आणि हेदेखील सफरचंदामुळेच. इथे लोकांचं दरडोई उत्पन्न खूप जास्त होतं. इथल्या सफरचंदांचा आकार चांगला मोठा आहे आणि 7 हजार 774 फूट उंचीवर पिकणाऱ्या या सफरचंदांचा दर्जा इतका चांगला आहे की, ती लवकर खराब होत नाहीत. इथे रॉयल, रेड गोल्ड, गेल गाला यांसारख्या जातीची सफरचंद होतात. बागायतदार या झाडांची काळजी लहान मुलांसारखी घेतात. तापमान शून्य डिग्री सेंटिग्रेडपेक्षा जास्त खाली गेलं तरी झाडांच्या खालचा बर्फ काढतात. गारा पडतील असं वाटलं तर पूर्ण बगिच्यावर जाळी घालतात. अलीकडे नवीन पिढीतील मुलं शहराकडे धावतात आणि हवाबदलदेखील परिणाम दाखवत आहे.

मडावग आणि किआरी गावाची प्रगती आजूबाजूच्या इतर गावांना काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. मडावग गावाजवळ वसलेले दशोली गावही उच्च दर्जाच्या सफरचंदांसाठी प्रसिद्ध होत आहे. दशोली गावात 8 हजार ते 8 हजार 500 फूट उंचीवर सफरचंदाच्या बागा आहेत. ही उंची उच्च दर्जाच्या सफरचंद उत्पादनासाठी आदर्श आहे. दशोलीचे सफरचंद दर्जेदार किन्नौर आणि जम्मू-कश्मीरच्या सफरचंदांनाही मात देत आहेत. इथले बागायतदार उत्तम दर्जाच्या सफरचंदाचे उत्पादन तर घेत आहेतच, शिवाय एकरी उत्पादनाचा पामही करत आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, दशोलीचा छोटा बागायतदारही सफरचंदांच्या एक हजार पेटय़ा तयार करत आहे.

शिवाय आता इंटरनेटच्या साहाय्याने इथले शेतकरी जगातील सफरचंदाच्या भावाचा अंदाज घेतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या सफरचंदांचा भाव लावणं सोपं पडतं. यामुळे इथल्या शेतकरी बंधूंना एक ‘रोल मॉडेल’ मिळालं आहे. मडावग दरवर्षी सफरचंदाचे किमान 15 लाख बॉक्सेस निर्यात करते. यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबं एकूणच उच्च राहणीमानाचा आनंद घेत आहेत आणि त्यांची मुलं चांगल्या शाळांमध्ये शिकत आहेत. याचाच परिणाम म्हणून शिकल्यानंतर ती नोकरीसाठी शहरांकडे वळत आहेत आणि मुलीसुद्धा जास्त कमावणाऱ्या शेतकरी मुलापेक्षा कमी कमावणाऱ्या, पण शहरात राहणाऱ्या मुलाशी लग्न करणं जास्त पसंत करत आहेत. समाजशास्त्राच्या अभ्यासकांच्या मते ही चिंतेची बाब आहे. कारण सर्वसाधारणपणे खेड्यात पुरेशी उत्पन्नाची साधनं नसणं हे स्थलांतराचं कारण असतं. श्रीमंत खेड्यातूनही माणसं शहरात जाताहेत ही त्यांच्या मते चिंतेची गोष्ट आहे.