
उच्च न्यायालयाने मोठय़ा गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यास परवानगी दिल्यामुळे माघी गणेशोत्सवामध्ये निर्बंधात अडकलेल्या बाप्पांचे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शनिवार, 2 ऑगस्ट रोजी विसर्जन होणार आहे. याबाबत कांदिवली आणि मालाडमधील सर्वाधिक मूर्तींचा समावेश आहे.
मुंबईत माघी गणेशोत्सवही मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी माघी गणेशोत्सवातील ‘पीओपी’च्या मोठय़ा मूर्तींचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यास बंदी घातली होती. अचानक घातलेल्या या बंदीमुळे विसर्जन मिरवणूक काढूनही गणेशभक्तांना आपली गणेशमूर्ती परत आणून गोडाऊनमध्ये ठेवावी लागली होती.
n विशेषतः पश्चिम उपनगरात मार्वे समुद्रावर विसर्जनासाठी नेलेल्या मूर्तींना माघारी पाठवण्यात आले होते. त्यामुळे पोलीस आणि पालिकेमध्ये प्रचंड संघर्ष निर्माण झाला होता. मात्र पोलीस आणि प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने या मूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. मात्र आता उच्च न्यायालयाने समुद्रात विसर्जनाला परवानगी दिल्याने पुढील शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून वाजतगाजत मिरवणूक काढून मूर्तींचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती मंडळांकडून देण्यात आली.
समन्वय समितीचे पालिकेला निवेदन
माघी गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी यासाठी मंडळांसह गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे.