
रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कुरिल बेटांवर रविवारी (10 ऑगस्ट 2025) 6.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यू.एस. जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) आणि पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरने या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर नोंदवली आणि सांगितले की, यामुळे सुनामीचा कोणताही धोका नाही. रशियाच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने कुरिल बेटांवर आणि जवळच्या कामचटका प्रायद्वीपावर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जिवितहानी किंवा मोठ्या नुकसानाची नोंद झालेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत कुरिल बेटे आणि कामचटका परिसरात सातत्याने भूकंपाचे हादरे जाणवत असल्याने प्रशासन सतर्क आहे. रशियन शास्त्रज्ञांनी यापूर्वीच पुढील काही आठवड्यांत या भागात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच येथे ज्वालामुखी उद्रेकाची भीतीही वरावण्यात आली आहे.