पक्षाशी गप्पा मारत होता, चायनीज खाता-खाता पक्षी डोळ्यात घुसला

ऑस्ट्रेलियात एक व्यक्ती चायनीज खात होता, खाता खाता समोरच्या एका पक्ष्याशी तो गप्पा मारत होता. अचानक त्या पक्ष्याने उग्र रुप धारण केले आणि व्यक्तीच्या डोळ्यातच शिरला. यात हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

द गार्डियन या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जेम्स ग्लिंडमन हा 68 वर्षीय वक्ती मॉलमध्ये गेला होता. मॉलच्या फूडकोर्टमधून त्याने चायनीज जेवण ऑर्डर केले आणि आपल्या टेबलवर बसून तो जेवणार इतक्यात एक मॅगपाय जातीचा पक्षी त्यांच्या समोर येऊन बसला. जेवताना जेम्स यांनी मास्क काढून ठेवले होते. जेम्स आपल्या जेवणाची तयारी करताना या पक्ष्याशी गप्पा मारत होते. जेवणाचा पहिला घास त्यांनी घेतला आणि या पक्ष्याने त्यांच्या डोळ्यावर जोरदार हल्ला केला. हा पक्षी जेम्स यांच्या जवळ जवळ डोळ्यात घुसला होता.

magpie-bird

कसाबसा जेम्स यांनी आपला जीव वाचवून तेथून पळ काढला आणि आपल्या गाडीजवळ पोहोचले. तेव्हा त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. जेम्स यांनी तातडीने रुग्णवाहिकेला बोलवले. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेम्स यांच्या डोळ्याला गंभीर जखम झाली होती. डॉक्टरांना लगेच शस्त्रक्रिया करावी लागली.

जेम्स म्हणाले की टेबलवर बसलो असताना हा पक्षी अचानक समोर आला. तेव्हा तो शांत होता. मी जेवण्यापूर्वी त्याला घास टाकला नाही, बहुधा त्याची तशी अपेक्षा होती. म्हणून तो चिडला आणि त्याने हल्ला केला असावा असा अंदाज जेम्स यांनी व्यक्त केला आहे.

डोळ्यावरील शस्त्रक्रिया केल्यानंतर जेम्स यांना घरी सोडण्यात आले. जेम्स यांना डाव्या डोळ्यातून अंधुक अंधुक दिसत होतं. त्यांना आपला डावा हात पूर्ण दिसत नव्हता. फक्त उजव्या डोळ्यांनी पूर्ण दिसत होता.ऑस्ट्रेलियात दरवर्षी मॅगपाय या पक्षाच्या हल्ल्यात 60 जण जखमी होतात अशी महिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या