
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आपला टोन बदलला आहे. राहुल गांधी यांनी योग्य मार्गदर्शन केल्यानंतर पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल, असे पत्रकारांना ठणकावून सांगितले.
काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवेल, असा एकच घोषा लावत काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत व वादाच्या भोवऱयात सापडले होते. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँगेस अशा तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे नानांच्या सततच्या वादग्रस्त विधानांवर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत होत्या. नानांच्या कार्यशैलीबाबत काँगेसमध्येही खदखद होती. इतकेच नाही, तर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये जातीयवाद सुरू आहे, अशी तक्रार नुकतीच काँगेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत राहुल गांधी यांची त्यांच्या तुघलक लेन या निवासस्थानी भेट घेतली.
सुमारे तासभर चाललेल्या भेटीत राहुल यांनी राज्यातील सरकारबद्दल माहिती घेतलीच, शिवाय पक्षसंघटना व सरकार या दोन भिन्न बाबी आहेत. आपल्यासाठी दोन्ही महत्त्वाचे आहे. तेव्हा जरा जपून, असे मार्गदर्शन केल्यानंतर नाना पटोले यांचा बोलण्याचा रागरंग बदलल्याचे दिसून आले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल, असा विश्वास बोलून दाखविला.




























































