महाबळेश्वरमध्ये अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात भूस्खलन का झाले? भूगर्भशास्त्रज्ञ शोधणार कारणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे जमीन खचणे, भेगा पडणे यांसह भूस्खलनाची पाहणी भूगर्भ शास्त्रज्ञांनी केली. या शास्त्रज्ञांनी किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असेल्या दरे दुधोशी व कोंडोशी या गावांतील जमिनींची तपासणी केली. भूस्खलनाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही भेट होती, अशी माहिती महसूल विभागाने दिली आहे.

जुलै महिन्याच्या 22 आणि 23 तारखेला महाबळेश्वर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यात हाहाकार माजला होता. महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहून गेल्याने या भागातील 22 गावांचा संपर्क तुटला होता. महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगर उतारावरून भूस्खलन झाले, दरडी कोसळल्या. या दरडी नदीत व तेथून नदीपात्रालगत असलेल्या शेतजमिनीमध्ये गेल्याने अनेक नद्यांचे प्रवाह बदलले. त्यामुळे नदी किनारी असलेल्या अनेक घरांना याचा फटका बसला. अनेक घरांची नासधूस झाली. घरात पाणी शिरले व घरातील संसारोपयोगी साहित्याची नासाडी झाली. जमिनी जागोगाजी खचल्या. अनेक ठिकाणी जमिनींना भेगा पडल्या. या दोन दिवसांत झालेल्या पावसाने अनेक गावांवर जमिनीमध्ये गडप होण्याचा धोका उद्भवला होता, तर काही ठिकाणी गावांवर दरड कोसळून अनेक गावांवर ‘माळीण’सारखी परिस्थिती ओढवली होती. सुदैवाने अशी वेळ आली नाही. परंतु, भविष्यात अशी वेळ येणार नाही, याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे तालुक्यातील 25 पेक्षा अधिक गावांनी पुनर्वसनाची मागणी
केली आहे.

महाबळेश्वरला भूस्खलन अथवा दरडी कोसळणे हे प्रकार नवीन नाहीत. परंतु, यंदा मात्र या प्रकारांची मालिका तयार झाली. एकाच वेळी अल्पावधीत या सर्वप्रकारची आपत्ती महाबळेश्वर तालुक्याच्या पश्चिम भागावर कोसळली. यामुळे सर्वच हादरले आहेत. त्यामुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर भूस्खलन का झाले, याचा आभ्यास करण्यासाठी येथे भूगर्भ शास्त्रज्ञांच्या टीमने भेट देऊन पाहणी केली.

यावेळी भूगर्भ शास्त्र्ाज्ञ परिमिता मॅडक, रिंपी गागई यांच्यासह महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील उपस्थित होत्या. स्थानिक नागरिक म्हणून या भागातील अभयसिंह हवालदार, बाळासाहेब पार्टे व आनंद कोतवाल, सुरेश सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.