महाबळेश्वरचा पारा घसरला, किमान तापमान 8.2 अंशावर पोहोचले

महाबळेश्वरमध्ये बुधवारी पारा चांगलाच घसरला. वातावरणात बदल होऊन थंडीचे प्रमाण तर वाढलेच; परंतु त्यामुळे आज सकाळी थंडीचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंड, गरम, दमट, ढगाळ अशा संमिश्र वातावरणाचा अनुभव स्थानिकांसह पर्यटकांना मिळाला. वेण्णा लेक, लिंगमळा परिसर गेली दोन दिवस चांगलाच गारठला असून, पारा 8.2 अंशांवर गेला आहे.

महाबळेश्वरमध्ये आज सकाळपासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. बुधवारी रात्री तापमानात घसरण होऊ लागली. महाबळेश्वर शहरात शालेय सहली व पर्यटकांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थंडी वाढू लागल्याने बाजारपेठेत चांगलीच गदर्दी झाली होती. वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा 8.2 अंशांवर आला असून, शहरात किमान तापमान 10.2 अंश आहे. या थंडीचा आनंद लुटण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य यांचे प्रमाण जास्त होते.

जानेवारी महिना सुरू झाल्यानंतर हळूहळू थंडीमध्ये वाढ होते. शनिवार रविवारपासून सर्वत्र तापमान घसरू लागल्याने कडाका वाढला आहे. महाबळेश्वरमध्येही तापमान 10 च्या खाली आले आहे. वेण्णा लेक परिसरात पर्यटक नौकाविहार करण्यासाठी तुडुंब गर्दी करत आहेत. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पर्यटक खरेदी करताना शाल, स्वेटर, कानटोपी घालून फिरत होते, तर काहींनी गरम कपडे खरेदी करण्याचा आनंद घेतला.

प्रसिद्ध केट्स पॉइंट, मुंबई पॉइंट, किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजली आहेत. पर्यटक येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पाहावयास मिळत आहेत, तर मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला सायंकाळी ‘चौपाटी’चे स्वरूप प्राप्त होते. पांचगणी- महाबळेश्वर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर पर्यटक चणे, जाम, स्ट्रॉबेरी, चॉकलेट खरेदी करत बाजारपेठेतील आकर्षक वस्तू खरेदीकडेदेखील पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.