महाबळेश्वरमध्ये केट्स पॉईंट परिसरात तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

महाबळेश्वरपासून 5 किमी अंतरावर असलेल्या आवकाळी गावच्या हद्दीतील प्रसिद्ध केट्स पॉईंट परिसरात पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील युवकाने आत्महत्या केली.

भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (वय 17) असे या तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह सुमारे 350 फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स प्रतापगड सर्च ऍण्ड रेस्क्यू टीमला यश आले आहे. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आला आहे.

ट्रेकर्सचे संजय पारठे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, सुहास बैलकर, सर्जेराव कुटेकर, जितेंद्र कदम आणि किरण चव्हाण हे या मोहिमेत सहभागी झाले. केट्स पॉईंटसारख्या पर्यटनस्थळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.