महाडच्या आंबेडकर कॉलेजात प्राध्यापकांचा रक्तरंजित राडा

823

प्राचार्यांच्या नियुक्तीचा वाद उफाळला

दोन गटांत हाणामारी

महाड,केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले अध्यक्ष असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजात आज प्राचार्यांच्या नियुक्तीवरून प्राध्यापकांमध्ये रक्तरंजित राडा झाला. दोन गट एकमेकांना भिडले आणि फ्री स्टाईल हाणामारी करीत एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. एवढेच नव्हे तर टेबल-खुर्च्यांची तोडफोड करीत दांडक्यांनी मारहाण केली असून कॉलेजच्या आवारात काचांचा खच पडला. या राडय़ामध्ये सहाजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

महाडमध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज असून गेल्या काही वर्षांपासून प्राचार्यपदाचा वाद सुरू आहे. संचालक मंडळात गांगुर्डे व मोरे असे दोन गट असून मोरे हे अध्यक्ष रामदास आठवले यांचे विश्वासू समजले जातात. दोन दिवसांपूर्वी धनाजी गुरव यांच्याकडे प्राचार्यपदाचा कार्यभार होता. मात्र सुरेश आठवले यांनी त्यावर दावा ठोकला. त्यामुळे दोघांच्याही समर्थकांनी आज हाणामारी केली. या हाणामारीत धनाजी जाधव यांच्यासह महेंद्र घारे, अरविंद साळवी, विठ्ठल गायकवाड, संजय हाटे हे जखमी झाले आहेत. त्यापैकी महेंद्र घारे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे.

  • सध्या संस्थेचा कारभार विद्यमान केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली चालतो. दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून संस्थेमध्येच संचालक मंडळाबाबत दोन उभे गट आहेत. त्यामुळे प्रामुख्याने त्यामुळे प्राचार्यपदाच्या खो-खोच्या डावात महाविद्यालयात यापूर्वीदेखील अनेक वेळा हमरीतुमरी झाली होती
  • एकमेकांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुह्यांची नोंद आहे. महाविद्यालयातील वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पोलीस संरक्षण वाढवले असून खासगी सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे.

गुन्हे दाखल

दोन दिवसांपूर्वी प्राचार्य धनाजी गुरव यांच्या विरोधात न्यायालयीन निकाल गेल्याने पुन्हा सुरेश आठवले हे विराजमान झाले होते. आज झालेल्या हाणामारीत सहभागी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान संशयितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या