
माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण त्याचा फायदा दुसऱया कुणालाही होऊ देणार नाही, असं सांगतानाच भाजपवर आपण नाराज असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जानकर यांनी नुकतीच भेट घेतली होती. यानंतर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्याचं त्यांनी खंडण केलं होतं. त्यानंतर जानकर यांनी फडणवीसांसोबत भांडण असल्याचं सांगत आपल्या मनातील खदखद जाहीपणे माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
भाजपवर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं, असं जानकर म्हणाले.
पडळकरांना टोला
धनगर समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या जानकरांना डावलून फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना जवळ केल्याने जानकर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना जानकर यांनी माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, असा टोला लगावत धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.



























































