उद्योग विभागामार्फत अकुशल कामगारांना कौशल्य विकासाचे मिळणार प्रशिक्षण, महाजॉब्ज पोर्टला प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी उद्योग विभागाने सुरु केलेल्या महाजॉब्ज पोर्टलवर आतापर्यंत 28 हजार 167 जणांनी स्वतःची इत्थंभूत माहिती नोंदवली आहे. त्यामध्ये  8 हजार 403 अकुशल कामागारांचा समावेश आहे. या अकुशल कामगारांना आता कौशल्य विकास व उद्योजवता विभागामार्फत प्रशिक्षण दिले जाईल. त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

महाजॉब्ज पोर्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 2  लाख 86 हजार जणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 28 हजार  167  जणांनी सर्व माहितीसह आपले प्रोफाइल पूर्ण केले आहे. त्यामध्ये 20 हजार 651  कुशल व अर्धकुशल आणि 8 हजार 403 अकुशल कामगार म्हणून नोंदणी झाली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या अकुशल कामगारांना कौशल्य विभागामार्फत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

नोकरीसाठी इच्छुक उमेदकारांनी पणन अधिकारी, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, टूल ऑपरेटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, ऑफिस असिस्टंट, व मनुष्यबळ विकास अशा क्षेत्राला अधिक प्राधान्य दिले आहे. या  क्षेत्रातील मनुष्यबळ कंपन्यांना उमेदवार सहजपणे उपलब्ध व्हावे, यासाठी संबधितांना सूचना दिल्या आहेत.