महानंद लष्कराच्या ईस्टर्न कमांडला 16 लाख लिटर दुधाचा पुरवठा करणार

लष्कराच्या इस्टर्न कमांडला महानंद डेअरी यंदा तब्बल 16 लाख लिटर टेट्रापॅक दुधाचा पुरवठा करणार आहे. प्रति लिटर दुधाचा दर जवळपास 63 रुपये असणार आहे. हे दूध आसाम आणि अरुणाचल परदेशातील पाच डेपोला पुरवले जाणार आहे. याबाबतचा करार महानंद डेअरी आणि इस्टर्न कमांड सोबत नुकताच झाला आहे.

महानंद डेअरीकडे पिशवीबंद दुधाबरोबरच सहा महिन्यापर्यंत दूध टिकणारा टेट्रापॅकिंगचा असेप्टिक प्लांट आहे. त्याची दिवसाला एक लाख लिटर दुध पॅकिंग करण्याची क्षमता आहे. येथे पॅकिंग झालेले दूध सहा महिन्यापर्यंत टिकत असल्याने लष्कराकडून त्याला चांगली पसंती दिली जात आहे. त्यामुळे डेअरीने 1 ऑक्टोबरपासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत 16 लाख लिटर दुधाची खरेदी करण्याचा करार केला आहे. हे दूध आसाम आणि अरुणाचल प्रदेश राज्यातील हसीमरा, गुवाहाटी, लिकबली, निसमारी आणि बेंगडुबी या डेपोला पुरवले जाणार असल्याचे महानंदच्या असेप्टिक प्लँटचे व्यवस्थापक आर. के. पाटील यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये अखंडित दूध पुरवठा केल्याचा फायदा

महानंद डेअरीने लॉक डाऊन काळात वाहतूक बंद असतानाही लष्कराच्या नॉर्दन कमांडला साडे तीन लाख लिटर तर इस्टर्न कमांडला अडीच लाख लिटर दुधाचा पुरवठा कोणत्याही विलंबशिवाय केला आहे. त्याची दखल घेत इस्टर्न कमांडने मागील वर्षीच्या तुलनेत दीड लाख लिटर जादा म्हणजे 16 लाख लिटर दुध खरेदी करण्याचा करार केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या