कोरोना संकटातही रोजगाराची सुवर्णसंधी, महाविकास आघाडी सरकारच्या पोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

622

 

महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखवली. महाजॉब्स आणि सरकारसुद्धा महाविकास आघाडीचे. महाराष्ट्रात ‘महा’ फॅक्टर आहे. उद्योगांना चालना, सर्वात मोठे प्लाझ्मा सेंटर आणि आता ‘महाजॉब्स’ पोर्टल. जे करू ते भव्यदिव्यच करू. ‘महाजॉब्स’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काळाची गरज ओळखून सुरू केलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगाराची संधी उपलब्ध करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणार्‍या  http://mahajobs.maharashtra.gov.in  या संकेत स्थळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, काwशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत  हे लोकार्पण करण्यात आले.

बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे

हे पोर्टल अधिक सोपे आणि सुटसुटीत असावे. पूर्वी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या माध्यमातून फक्त बेरोजगारांची माहिती कळायची. पण किती लोकांना रोजगार मिळाला हे कळायचेच नाही. तसे या पोर्टलच्या बाबतीत अजिबात होऊ नये. या पोर्टलचा नोकरी, रोजगार देण्यासाठी किती उपयोग होतो याचा नियमित आढावा घेतला जावा. यात उद्योजक आणि राज्यातील युवकांना काही अडचणी येत असतील तर त्याचाही अभ्यास केला जावा.  हे पोर्टल बेरोजगाराची नोंदणी करणारे नाही, तर बेरोजगारांना काम उपलब्ध करून देणारे पोर्टल व्हावे असेही ते म्हणाले.

विकास म्हणजे जिथल्या तिथे रोजगार

विकास म्हणजे जिथल्या तिथे रोजगार मिळाला पाहिजे, रोजीरोटी मिळाली पाहिजे, घर मिळाले पाहिजे आणि साहजिकच आहे, समाधान मिळाले पाहिजे. हे जर आपण सर्व एकत्र करून पुढे जात असू तर आपण निश्चित विकासाच्या दिशेने चाललो आहोत. महाजॉब्सच्या माध्यमातून राज्यातील उद्योजक, भूमिपुत्र यांच्या दोघांच्याही गरजा भागवल्या जाव्यात. उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ मिळावे तर युवकांना रोजगार, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोनाने आत्मनिर्भर व्हायला शिकवले

कोरोनाने आपल्यापुढे संकट निर्माण केले असले तरी काही गोष्टी निश्चित शिकवल्या आहेत. माणूस वणवण फिरतो, अपार मेहनत करतो, कष्ट करतो ते घरासाठी, पण घरासाठी मेहनत करताना घराकडे बघायला वेळ नव्हता. कोरोनाने गेले काही दिवस घराकडे बघायला शिकवलं आहे. आरोग्याकडे पाहायला शिकवलं आहे, आत्मनिर्भर व्हायला शिकवलं आहे, असे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे म्हणाले.

कामगार कपात करू नका

मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगरसारख्या औद्योगिक पट्टय़ांत अजूनही कोरोनाचे संकट आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना आपण राज्यात नवीन गुंतवणुकीला निमंत्रण देत आहोत, त्यांच्यासमवेत सामंजस्य करार करताना त्यांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. कोरोनामुळे परराज्यातील अनेक कामगार त्यांच्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे राज्यात नोकर्‍या उपलब्ध होत आहेत; पण कामगार नाहीत अशी स्थिती एकीकडे आहे तर दुसरीकडे काही उद्योग कामगार कपात करत आहेत. हे अजिबात योग्य नाही. उद्योजकांना भेडसावणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन तत्पर आहे. अशावेळी कामगार कपात करणे योग्य नाही. उद्योग विभागाने या सर्व उद्योजकांशी बोलून त्यांच्या अडचणी सोडवण्याबाबत आश्वस्त करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेईल  – दिलीप वळसे-पाटील

उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास एकत्रित आल्याने महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यास मदत होईल. या पोर्टलमधून नवे-जुने, पुशल-अपुशल कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळेल, असे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

नवीन उद्योगांत सुसूत्रता येईल -नवाब मालिक

नवीन उद्योगांत सुसूत्रता येण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल. नवीन उद्योगांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. महास्वंय व महापोर्टलमध्ये होणार्‍या नोंदणीची माहिती ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी फायद्याची ठरेल, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल

महाजॉब्स पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, केमिकल आदी 17 क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यातील 950 प्रकारच्या व्यावसायासाठी इच्छुक उमेदवार निवड करू शकतात. स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकरीची संधी मिळावी यासाठी अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्राची अट यामध्ये आहे. याद्वारे राज्यातील बेरोजगारी संपवण्यासाठी मदत होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

पोर्टल सुरू होताच नोकरी मिळण्यास सुरुवात

महाजॉब्स पोर्टल सुरू होताच विको लॅबरोटरीज तसेच दीपक फर्टिलायझरने तत्काळ कर्मचाऱयांची गरज असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे राज्यातील उद्योजक व तरुणांनी या पोर्टलचे स्वागत केले आहे. वेबपोर्टलचे अनावरण झाल्यानंतर काही तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी सुरू केली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

50 हजार रोजगार उपलब्ध

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांत 50 हजार रोजगार उपलब्ध असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या पोर्टलद्वारे नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात शासनाने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या