महाराष्ट्र केसरीच्या अधिकृततेबद्दल संशयाचे ‘मोहोळ’; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ना लेटरहेड, ना लोगो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या कृपेने अधिकाराचा दुरुपयोग करून अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला डावलून पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन होत आहे. अस्थायी समितीच्या मार्फत हा रडीचा डाव खेळला जात असून महाराष्ट्रातील या मानाच्या स्पर्धेसाठी ना राज्य कुस्तीगीर परिषदेचे लेटरहेड वापरले जात आहे, ना अधिकृत लोगो. त्यामुळे पुण्यात होत असलेली 65वी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा खरंच अधिकृत आहे काय? असे संशयाचे ‘मोहोळ’ उठायला सुरुवात झाली आहे.

स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाताना राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रामदास तडस, स्पर्धा संयोजक व माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि अस्थायी समितीचे अध्यक्ष संजयकुमार सिंग यांची चांगलीच दमछाक झाली व त्यांना ही पत्रकार परिषद अक्षरशः गुंडाळावी लागली. राज्य कुस्तीगीर परिषदेची राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाकडून चौकशी सुरू असल्याने नेमलेल्या अस्थायी समितीच्या मान्यतेने यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा होत असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मात्र संजयकुमार म्हणतात, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. खरंच कुस्ती परिषद बरखास्त केली असेल तर तसे राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे पत्र त्यांनी दाखवायला हवे होते. त्यामुळे सध्यातरी केवळ सत्तेचा दुरुपयोग करून आणि नियम धाब्यावर बसवूनच स्पर्धेचे आयोजन होत आहे, असेच म्हणावे लागेल.

‘महाराष्ट्र केसरी’ की निमंत्रित स्पर्धा?

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी संलग्न असलेले जिल्हा संघ ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होतात अशी परिषदेची घटना आहे. मात्र घटनेलाच बासनात गुंडाळून यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत यजमान पुण्याचे चार संघ खेळणार आहेत. यातील दोन संघांना निमंत्रित संघ म्हणून स्पर्धेत प्रवेश दिला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे की निमंत्रित स्पर्धा? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

स्पर्धेबद्दल संदिग्धता कायम

यंदाची महाराष्ट्र केसरी 2022-23 स्पर्धा नव्या वर्षात 10 ते 14 जानेवारी या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आश्रयदाते शरद पवार यांनी पुण्यातील स्पर्धेला मान्यता दिली आहे. मात्र ही स्पर्धा अस्थायी समितीमार्फत नव्हे, तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मार्फत व्हायला हवी, असे शरद पवार यांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेला डावलून या स्पर्धेचे आयोजन झाल्यास ऐनवेळी कुस्तीगीर परिषद न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता आहे.