
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. लॉगीन आयडी व पासवर्ड तयार करून विद्यार्थी अर्जाचा भाग-1 भरू शकतात. मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर आदी महानगरपालिकांमध्ये असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरू शकतात.
शिक्षण संचालनालयाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची कार्यवाही मागील महिन्याच्या अखेरीस सुरू केली आहे. केवळ नोंदणी आणि प्राथमिक माहिती भरण्यासाठी 9 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात आता विद्यार्थ्यांना 16 ऑगस्टपासून आपला अर्ज आणि त्यातील भाग-1 हा पूर्ण भरता येणार आहे. त्यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारूप नोंदणी करण्याची सुविधा शिक्षण विभागाकडून दिली जाणार असल्याची माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. जे विद्यार्थी 16 ऑगस्टपासून आपले ऑनलाइन अर्ज भरतील ते अर्ज आणि त्यातील माहिती तपासून घेण्याची जबाबदारी संबंधित माध्यमिक शाळा आणि मार्गदर्शन केंद्रांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यासोबतच ही माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक स्तरावरही तपासली जाणार आहे. तर प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाचा भाग-2 काही दिवसांतच जाहीर केला जाणार असल्याचेही संचालक जगताप यांनी सांगितले.


























































