काँग्रेस–राष्ट्रवादी पराभवाच्या मानसिकतेत, मुख्यमंत्री फडणवीस यांचा हल्ला

691
cm-devendra-fadnavis

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण या निवडणुकीत काही उत्साहच वाटत नाही, मजाच येत नाहीये, समोर कुणी दिसतच नाहीये. आपले सर्व पैलवान तेल लावून मैदानात उतरलेत, पण समोर दुसरा पैलवानच नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पायपोस एकमेकांच्या पायात नाहीत. त्यामुळे ते पहिल्यापासूनच पराजयाच्या मानसिकतेत गेले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

नगरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी महापौर अभिषेक कळमकर शिवबंधनात

धुळ्याच्या नेर येथील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात त्यांनी जगातली सर्व आश्वासने देऊन टाकली. केवळ प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आशवासन देणे बाकी आहे. कारण आश्वासने पूर्ण करायचीच नाहीत हेच त्यांचे धोरण आहे. गेली 50 वर्षें खोटे बोल, पण रेटून बोल अशा प्रकारचे राजकारण त्यांनी केले. त्यांनी जनतेचा कधीच फायदा करून दिला नाही. उलट स्वतःचाच फायदा करून घेतला, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

शहांचा प्रचार सभांचा धडाका, परळीनंतर चिखलीत महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा

आम्ही 24 तास जनतेसाठीच काम केले

गेल्या पाच वर्षांत केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकलेले नाहीत. कारण आम्ही 24 तास केवळ जनतेसाठी काम केलेय. जनतेचा पैसा जनतेकडेच नेला. आघाडी सरकारच्या काळात राज्यातला शेतकरी पुर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. अशा वेळी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. त्यावेळच्या सरकारने शेतकऱ्यांना 20 हजार कोटींची मदत केली, पण महायुतीच्या सरकारने केलेली मदत 50 हजार कोटींची होती. आम्ही राज्यात 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून ती अजूनही सुरूच आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्र समृद्ध करायचाय

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यामुळे कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग झाला आहे. मोदींनी हे करून दाखवले. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात शक्तिशाली हिंदुस्थान तयार होत आहे. आता मोदींच्याच नेतृत्वात एक शक्तिशाली आणि समृद्ध महाराष्ट्र तयार करायचाय, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार

प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात शेतकऱ्यांना वर्षाला 12 कोटी रुपये दिले जात होते. आम्ही 10 हजार कोटी दिले. जलयुक्त शिवार योजनेतून जवळजवळ 1 लाख 60 हजार शेतकऱ्यांना शेततळी दिली, दीड लाख शेतकऱ्यांना विहिरी दिल्या याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या