सामना अग्रलेख – थकलेल्या पक्षाची कहाणी!

3655

सुशीलकुमारजी, तुम्ही बोललात ते खरंच आहे. काँगेस पक्ष हा थकलेलाच पक्ष आहे. फरक इतकाच की, ‘सगळं करून भागला आणि नंतर थकलाअशी त्याची अवस्था आहे. म्हणूनच जनताही त्याला मतांचे टॉनिक द्यायला तयार नाही आणि नेतेकार्यकर्ते या थकल्या पक्षात राहायला तयार नाहीत. काँग्रेस काय किंवा नावात काँगेस असलेला राष्ट्रवादी काय, दोन्ही थकलेल्या पक्षांची कहाणीही अशी आहे. सुशीलकुमार बोलले, शरद पवारांनी सवयीप्रमाणे ते नाकारले, इतकेच.

तब्बल दीडशे वर्षांचा वारसा आणि सर्वाधिक काळ सत्तापक्ष म्हणून राहिल्याचा ठसा असलेल्या काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या नेमकी कशी आहे, या प्रश्नाचे उत्तर आता त्याच पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहे. एक आहेत सलमान खुर्शीद आणि दुसरे आहेत आपले सुशीलकुमार शिंदे. खुर्शीदमियांनी तर महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँगेस पक्ष जिंकणे कठीण आहे असा फटाका मतदानाआधीच फोडला आहे. पक्षाचे भवितव्य अंधारात असल्याची भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. इकडे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांनी ‘काँग्रेस पक्ष आता थकला आहे,’ असे सांगत खुर्शीदमियांच्या कबुलीनाम्यात हवा भरली आहे. पुन्हा या कबुलीनाम्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसलाही ओढले आहे. ‘राष्ट्रवादी काँगेस पक्षदेखील आता थकला आहे. शरद पवार यांचे वय झाले आहे. ज्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँगेस पक्ष निर्माण झाला तो मुद्दादेखील आता उरलेला नाही. त्यामुळे भविष्यात काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस परस्परात विलीन होतील,’ अशी फटाक्यांची लडच सुशीलकुमार यांनी लावली. अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांच्या लवंगी फटाक्यांची वात काढून घेतली आहे. ‘शिंदे स्वतःच्या पक्षाबद्दल बोलले असावेत. माझ्या पक्षाची स्थिती मला चांगली माहिती आहे,’ असे सांगत पवार यांनी विलीनीकरणाची ‘शिंदेशाही’ डोक्यावर घेण्यास नकार दिला आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीतरी एकाच झाडाखाली वाढले. ते एकाच आईची लेकरे आहेत. एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढले,’ असेही सुशीलकुमार म्हणाले. त्यांचे म्हणणे खोटे नाही. तथापि, काँग्रेसमध्ये ‘माय’ म्हणेल ती

पूर्व दिशा

तर राष्ट्रवादीमध्ये ‘बाप’ म्हणेल ती पूर्व दिशा अशी स्थिती आहे. अशावेळी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाचा बार तूर्त तरी फुसकाच निघणार होता. बरं, पवार म्हणतात, मी थकलेलो नाही. ते ज्या पद्धतीने या वयातही निवडणूक प्रचार करीत आहेत, फिरत आहेत ते पाहता त्यांच्यापुरता हा दावा खरा मानला तरी त्यांचा पक्ष काँग्रेसप्रमाणे थकला-भागलाच आहे. त्यांचे नेते-कार्यकर्ते तेथे राहायला तयार नाहीत आणि त्यांना थोपविण्याची ताकद त्या पक्षात राहिलेली नाही. उरला प्रश्न तो काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या दाव्याचा. खुर्शीद काय किंवा सुशीलकुमार काय, दोघेही ज्येष्ठ नेते आहेत. काँग्रेस पक्षाचे, त्यातही गांधी घराण्याचे निष्ठावंत पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी मांडलेले मत महत्त्वाचेच ठरते. त्यात चुकीचेही काही नाही. काँग्रेस पक्ष काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय, सध्याच्या राजकारणातील ‘थकलेले घोडे’च आहेत. त्यांच्या घोडेस्वारांची मांड घट्ट राहिलेली नाही. निवडणुकीच्या शर्यतीत या दोन्ही घोडय़ांवर ‘जॅकपॉट’ लागत नाही हे 2014 पासून वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे नावात काँगेस असलेले हे दोन्ही पक्ष थकलेलेच आहेत. काँगेस पक्ष तर एवढा थकला आहे की, राहुल यांनी ‘जॉकी’ म्हणून राहण्याचेही नाकारले आणि पुन्हा एकदा सोनिया गांधींना या ‘थकल्या-भागल्या’ पक्षाचा लगाम हाती घेण्याची वेळ आली. पुन्हा त्यादेखील वयोपरत्वे थकलेल्याच आहेत. तरीही

पक्षाची धुरा

त्यांनी स्वीकारली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल यांच्या नेतृत्वाने थोडी उभारी दाखवली होती. त्यांच्या जोडीला प्रियंका गांधी नावाचे ‘टॉनिक’ही पक्षाला देण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा ‘शरपंजरी’ पडला. बरं, ज्या तीन-चार राज्यांत त्या पक्षाची सत्ता आहे तेथेही सगळा कारभार म्हाताऱया अर्कांच्याच हाती आहे. मग काँग्रेस नावाचा दीडशे वर्षांचा पक्ष थकणार नाही तर काय होणार? पूर्वी निदान या पक्षात म्हातारे आणि तरुण ही विभागणी ठळकपणे दिसत होती. आता तरुण तुर्क तुरळक आणि म्हातारे अर्क अनेक आहेत. वरती म्हातारे अर्क आणि खालती कार्यकर्ते पळण्यात गर्क अशी स्थिती झाल्यावर पक्ष थकणार नाही तर काय? तो पुन्हा बरा होण्याची शक्यता एमआयएमचे ओवेसी यांनाही वाटत नाही. अन्यथा ‘कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी काँग्रेस पक्ष पुन्हा उभा राहणार नाही,’ असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले नसते. तेव्हा सुशीलकुमारजी, तुम्ही बोललात ते खरंच आहे. काँगेस पक्ष हा थकलेलाच पक्ष आहे. फरक इतकाच की, ‘सगळं करून भागला आणि नंतर थकला’ अशी त्याची अवस्था आहे. म्हणूनच जनताही त्याला मतांचे टॉनिक द्यायला तयार नाही आणि नेते-कार्यकर्ते या थकल्या पक्षात राहायला तयार नाहीत. काँग्रेस काय किंवा नावात काँगेस असलेला राष्ट्रवादी काय, दोन्ही ‘थकलेल्या पक्षांची कहाणी’ ही अशी आहे. सुशीलकुमार बोलले, शरद पवारांनी सवयीप्रमाणे ते नाकारले, इतकेच.

आपली प्रतिक्रिया द्या