नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार होऊया!

912
aditya-thackeray-rally-in-n

#MahaElection 2019 मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. पण हीच ती वेळ आहे नवा महाराष्ट्र घडवण्याची… युवकांना रोजगार देण्याची आणि गोरगरीबांच्या वेदनांवर फुंकर घालण्याची. युवकांनो, आपण सर्वजण एकजुटीने शपथ घेऊया आणि नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार होऊया.. अशी साद आज शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घातली. शिवसेना विकास करण्यासाठी बांधील असून विकास हाच नव्या महाराष्ट्राची दिशा ठरवणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

शहापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारासाठी दणदणीत जाहीरसभा झाली. आदित्य ठाकरे यांनी उन्हात उभे राहून संवाद साधण्यास सुरुवात केली. भाषणासाठी व्यासपीठावर येताच उपस्थितांनी कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… अशा गगनभेदी घोषणा देत अवघा परिसर दणाणून सोडला. या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शहापूर भगवे झाले होते.

यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हा ग्रामीणप्रमुख व हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, विठ्ठल भेरे, पुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, आरपीआयचे विनोद थोरात, महिला आघाडीच्या रश्मी निमसे, गुलाब भेरे, शोभा मेंगाळ आदी उपस्थित होते.

भूमिपुत्रांनाच नोकऱया देणार

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, शहापूरला सभेसाठी येताना मला विविध रंगांचे झेंडे दिसले. पण लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा झेंडा मात्र भगवाच राहील. नवा महाराष्ट्र घडवणे हे माझे स्वप्न असून ते एकटय़ादुकटय़ाचे काम नाही. त्यासाठी विकासकामांसाठी भांडणाऱया युतीच्या आमदारांची तसेच तरुणांची गरज आहे. भूमिपुत्रांबाबत बोलताना त्यांनी स्थानिकांच्या प्रश्नाला हात घातला. ते म्हणाले की, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी मंजूर केल्या आहेत. मात्र तेथे आंतरराष्ट्रीय कंपन्या आणून प्राधान्याने स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकऱया देण्याची अट घालणार आहे.

शिवसेनेच्या शाखा 24 तास सुरू

निवडणुका आल्या की, अनेक हौशे-गवशे आपल्या पक्षांची कार्यालये उघडतात. मात्र निवडणुका संपताच ही कार्यालये पाच वर्षांसाठी बंद होतात. पण अपवाद फक्त शिवसेनेचा असून शहरांसह ग्रामीण भागातील शिवसेनेच्या शाखा दिवस-रात्र सुरू असतात असे सांगून आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या शाखांमधून सामाजिक कार्य केले जात असून सर्वसामान्य जनता शिवसेनेसोबतच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या