उद्या मतदान… छत्री, रेनकोट तयार ठेवा

439

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी होणाऱ्या मतदानावर पावसाचे सावट असणार आहे. शुक्रवारपासून मुंबईसह उपनगरात आणि राज्याच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारीही मुंबई, ठाण्यात हलका तर काही जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पुढचे दोन दिवस मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मतदानादिवशी छत्र्या, रेनकोट पुन्हा बाहेर काढावे लागणार आहेत.

तलवारी म्यान, तोफा थंडावल्या! भरपावसात प्रचारसभा, बाईक रॅली व प्रचारयात्रांचा धडाका

मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी दिवसभर पावसाची रिपरिप राहील, तर दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी राज्यभरातील मतदान केंद्रांवर जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने पथनाटय़े तसेच अनेक माध्यमांमधून जनजागृतीही करण्यात आली आहे.

का पडतोय पाऊस?

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे हा पाऊस पडत आहे. हा पट्टा आणखी गडद होण्याची चिन्हे असल्याने पुढचे दोन दिवस राज्यात पावसाची हजेरी राहील अशी माहिती स्कायमेटच्या महेश पलावत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या