एमपीएससी सदस्यांच्या रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार, अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दुःखदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. उमेदवारांना न्याय देण्यासाठी एमपीएससी सदस्यांची सर्व पदे 31 जुलैपर्यंत भरण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला. सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला. हा लाखो मुलांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. सगळे कामकाज बाजूला ठेवून एमपीएससीवर चर्चा करा, अशी मागणी त्यांनी केली. एमपीएससी आपल्या पावलाने चालली आहे. एका स्वप्नीलने आत्महत्या केली तरी एमपीएससीला काही फरक पडत नाही. एमपीएससीला स्वायत्तता दिली म्हणजे स्वैराचार करण्याची मुभा दिली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांनी लोणकर कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत द्या, अशी मागणी केली.

त्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबीयांवर ओढवलेले दुःख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचे सांगितले. लोणकर कुटुंबीयांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निणर्य घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निणर्य आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येची घटना वेदनादायक आहे. अशी घटना कोणाच्याही बाबतीत होऊ नये. लोणकर कुटुंबीयांच्या मदतीबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी पावले उचलण्यात येतील. – अजित पवार, उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री स्वत: लक्ष घालत आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वतः लक्ष घालत असून एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱयांशी चर्चा करून भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.