
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधान भवनात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री डॉ. अनिल परब यांच्यासह मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे व अन्य सदस्य उपस्थित होते.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन हे अधिवेशन मुंबईत दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनात श्रद्धांजली कार्यक्रम, शोकप्रस्ताव आणि पुरवणी मागण्या मांडल्या जातील. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे अधिवेशन दोन आठवडय़ांसाठी घेण्याची मागणी केली होती.
कोरोना चाचणी बंधनकारक
हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे. यासाठी 12 आणि 13 डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतले जाईल. या अधिवेशनासाठी येणाऱया दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येईल.
ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना विधानभवनात प्रवेश मिळणार नाही. यासंदर्भात विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात तयारी सुरू आहे.

























































