भाजपच्या नव्या संघावर फडणवीसांच्या स्वयंसेवकांचे वर्चस्व; खडसे, तावडे, मुंडे यांची झोळी रिकामीच!

9726

विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश महेता तसेच पंकजा मुंडे यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपण्याची चिन्ह नाहीत. विधानसभा, विधान परिषद नाही किमान राज्य कार्यकारणीत तरी एखादी महत्वाची जबाबदारी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या या नेत्यांची झोळी मात्र रिकामीच राहीली आहे. त्यांची भाजपच्या प्रदेश कार्यसमितीत विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करत बोळवण करण्यात आली आहे. भाजपच्या नव्या संघावर फडणवीसांच्या स्वयंसेवकांचे वर्चस्व दिसून येत असून शायना एन.सी., अतुल भातखळकर यांना आराम देण्यात आला आहे.

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा शुक्रवारी केली. यामध्ये 12 प्रदेश उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस (महामंत्री), कोषाध्यक्ष यांच्यासह 7 मोर्चाचे अध्यक्ष व 12 मंत्री यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानपरिषदेवर घेऊन राजकीय पुनर्वसन केली जाण्याची अपेक्षा असणाऱया पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांच पुनर्वसन नाही, मात्र त्यांच्या कुटुंबातच खासदार प्रीतम मुंडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी तर खासदार रक्षा खडसे यांचा मंत्री म्हणून कार्यकारिणीत वर्णी लावण्यात आली आहे.

शायना एनसी, भातखळकर यांना पदावरून हटवले
कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी पाहणाऱया शायना एन.सी यांना हटवून मिहीर कोटेच्या यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर महामंत्री पदावरून अतुल भातखळकर यांना बाजूला करत फडणवीस यांचे विश्वासू श्रीकांत भारतीय यांची मुंबईतून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचाही महामंत्री म्हणून कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

मेधा कुलकर्णी यांनाही डावलले
चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारीचा त्याग करणाऱया प्रा. मेधा कुलकर्णी यांना राज्यात मोठी जबाबदारी मिळण्याची आशा होती. मात्र त्यांची कोणत्याही पदावर नियुक्ती न करता त्यांना डावलण्यात आले आहे. प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणून त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

आशीष शेलार विधानसभा मुख्य प्रतोद
माजी मंत्री आशिष शेलार यांचा महामंत्री म्हणून प्रदेश कार्यकारिणीत समावेश केला जाईल, अशी चर्चा होती. पण शेलार यांच्याकडे विधानसभा मुख्य प्रतोद ही जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. माधुरी मिसाळ यांच्याकडे प्रतोद ही जबाबदारी असेल. माधव भंडारी यांना उपाध्यक्ष पदावर बढती देत त्यांच्या जागी केशव उपाध्ये यांच्याकडे मुख्य प्रवक्ता पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कार्यकारिणीतील पदाधिकारी
उपाध्यक्ष – राम शिंदे, संजय कुटे, माधव भंडारी, जयकुमार रावल, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, भारती पवार, चित्रा वाघ, कपील पाटील, जयप्रकाश ठाकूर, महामंत्री ः चंद्रशेखर बावनकुळे, सुजितसिंह ठाकूर, देवयानी फरांदे, रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, मंत्री ः प्रमोद जठार, रक्षा खडसे, संदिप लेले, स्नेहल कोल्हे. महिला मोर्चा अध्यक्ष ः उमाताई खापरे, युवा मोर्चा अध्यक्ष ः विक्रांत पाटील, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष ः सुधाकर भालेराव, किसान मोर्चा अध्यक्ष ः अनिल बोंडे

पंकजा मुंडेंना केंद्रात जबाबदारी मिळेल – चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडेंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या 100 टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पक्षात नाराजी नसली तर जिवंतपणाचे लक्षण नसते. त्यामुळे नाराजी असलीच पाहिजे. पण सदा सर्वकाळ कोणी नाराज नसते, अशी पुष्टी त्यांनी यावेळी जोडली.

आपली प्रतिक्रिया द्या