
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 23 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान भवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. या बैठकीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज आणि कामकाजाचा कालावधी निश्चित केला जाईल. तसेच राज्याचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प 6 मार्च 2026 रोजी सादर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक संपून आचारसंहिता संपुष्टात आल्याने उद्या मंत्रिमंडळ बैठक होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दुपारी 12 वाजता मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील सभागृहात मंत्रिमंडळ बैठक होईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली मंत्रिमंडळाची उद्याची पहिलीच बैठक आहे. या बैठकीत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.



























































