
फारच आक्रित घडलंय. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. पण काळजी करू नका, तुम्ही फक्त स्वतःला सावरा. गहाळ झालेल्या कागदपत्रांचीही चिंता करू नका. जे काही करायचे आहे ती ती सर्व मदत सरकार करेल. संपूर्ण नुकसानभरपाई देतानाच सर्वांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडग्रस्त तळिये ग्रामस्थांना धीर दिला. मुख्यमंत्री भर पावसात चिखल तुडवीत तळिये गावात पोहचले आणि त्यांनी गावकऱयांचे सांत्वन करीत त्यांचे अश्रू पुसले.
महाड तालुक्यातील तळिये येथे गुरुवारी सायंकाळी अख्ख्या गावावर दरड कोसळून 42 बळी गेले आहेत तर 50 जण अद्यापही ढिगाऱयाखाली बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळिये ग्रामस्थांना भेटण्यासाठी आज महाड येथे रवाना झाले. दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री घटनास्थळी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळिये गावात येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱयांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेत दुर्घटनेतील नातेवाईकांचे आणि गावकऱयांचे सांत्वन करीत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच तुमच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असा धीरही दिला.
डोंगराखालील गावांचे पुनर्वसन
अशा अनपेक्षित घटना वारंवार घडत आहेत, असा गेल्या अनेक वर्षांचा आपला अनुभव आहे आणि यातून शहाणं होण्याची हीच वेळ आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आजकाल पावसाळ्याची सुरुवातसुद्धा चक्रीवादळाने होते. अशा घटना पाहता डोंगरउतार आणि कडेकपाऱयात राहणाऱया धोकादायक वाडय़ा, वस्त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचे नियोजन करताना तसा आराखडाच तयार केला जाईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे माणसेच आहेत
या गोष्टींमधून आता आपण शिकत पुढे चाललो आहोत. अशा घटना घडू नये आणि घडल्या तर त्यात जीवितहानी होऊ नये अशा पद्धतीने सरकार व्यवस्थापन करत आहे. पेंद्रीय यंत्रणांकडून व्यवस्थित सहकार्य मिळत आहे. आर्मी, नेव्ही, एअरपर्ह्सचीही योग्य मदत मिळत आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपले लोक पोहचले आहेत. अजूनही काही ठिकाणी माणसे पोहचली, पण यंत्रसामग्री पोहचू शकत नाही अशी परिस्थिती असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापन पुरेशा ताकदीने येथे येत नाही, असे पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री म्हणाले, असे म्हणणे अयोग्य आहे. जेव्हा घटना घडते तेव्हा जिथून शक्य असेल तिथून आपत्ती व्यवस्थापन टीम पोहचत असते. मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की, आपत्ती व्यवस्थापनातही माणसेच काम करतात. जिथे रस्ते खचतात, पूर येतोय तिथे पोहचायला उशीर होतोय. हा एक नाईलाजाचा भाग आहे.
सुभाष देसाई यांच्याकडून पाहणी
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही तळिये गावाची पाहणी केली. त्यांनी पीडित नागरिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असे देसाई यांनी यावेळी सांगितले.
































































