राज्यात मंगळवारी 10 हजार 425 कोरोनाचे रुग्ण; 12 हजार 300 जण कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मंगळवारी कोरोनाच्या मूळ रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. आज राज्यात एकूण 10 हजार 425 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासांत राज्यात 12 हजार 300 रुग्ण बरे होऊन परतल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे 329 जणांचा मृत्यू झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या हळहळू वाढत आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 5 लाख 14 हजार 790 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73.14 टक्क्यांवर पोहचले आहे. तर राज्यात मंगळवारी दिवसभरात 10 हजार 425 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून कोरोना रुग्णांची संख्या आता 7 लाख 3 हजार 823 पोहचली असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत दिवसभरात 883 कोरोनामुक्त, 35 जणांचा मृत्यू

मुंबईत आज दिवसभरात 883 कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 11,967 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आज 35 इतक्या आतापर्यंतच्या सर्वात कमी मृत्यूंची नोंद झाली. मात्र, ‘आयसीएमआर’च्या संकेतस्थळांवर काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे कोरोनाची मंगळवारी लागण झालेल्या रुग्णांचा आकडा (587) अद्ययावत उपलब्ध होऊ शकलेला नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

देशात कोरोनाचे 60,975 नवे रुग्ण, 24 तासांत 848 जणांचा मृत्यू

देशभरात मंगळवारी कोरोनाचे 60,975 नवे रुग्ण आढळले, तर 24 तासांत 848 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 31 लाख 67 हजार 324 आणि बळींचा आकडा 58,390 वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 7 लाख 4 हजार 348 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 24 लाख 4 हजार 585 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.