
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) आपली निवडणूक जाहीर करताच संघटनेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पूर्वीपासून सुरू असलेला वाद अधिकच विकोपाला गेला आहे. ‘एमसीए’ची होणारी निवडणूक ही ‘बीसीसीआय’च्या घटनेची पायमल्ली करणारी आणि पूर्णतः बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
माजी रणजीपटू अनिल काल्हेकर आणि ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही पोलखोल केली. अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘एमसीए’च्या गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियममध्ये येत्या 2 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. मात्र, एमसीएने सादर केलेली घटना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अद्यापि मान्य केलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक कायदेशीर कशी, हे एमसीएने निवडणूक अधिकारी म्हणून नेमलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आम्हाला समजावून सांगावे, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक प्रक्रिया ही ‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार व्हायला हवी. मात्र, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडे मान्यताप्राप्त घटनाच नाही.




























































