
विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलत मूल्यवर्धित करात म्हणजे व्हॅटमध्ये कपात करण्याची विनंती राज्य सरकारांना केली. महाराष्ट्र सरकारने त्वरित पावले उचलली आणि महायुती सरकारने व्हॅटमध्ये तब्बल 11 टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे विमान कंपन्यांना फायदा होणार असला तरी आधीच तिजोरीत खडखडाट असलेल्या महाराष्ट्र सरकारचा दरवर्षाला तब्बल 600 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.
राज्य सरकारने 14 मे रोजीच्या अधिसूचनेद्वारे विमान इंधनावरील व्हॅट 18 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विमान तिकिटांचे दर कमी होणे अपेक्षित आहे. स्पर्धात्मक कर ठेवण्यासाठी राज्य सरकारने मार्च 2023 मध्ये विमान इंधनावरील व्हॅट 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत तो आणखी कमी करण्यात आला आहे. पेट्रोलियम पदार्थांवर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमधून सरकारला सन 2025-26 या आर्थिक वर्षात 40 हजार कोटी तर सन 20024-25 मध्ये 37 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाजप शासित राज्यांना खड्डा
आखाती युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन दरात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम विमान तिकिटांच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी केंद्र सरकारमध्ये प्रवाशांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्वाधिक व्हॅट आकाणाऱ्या राज्यांशी संवाद साधत संबंधित राज्यांना 3 ते 6 महिन्यांसाठी तात्पुरती व्हॅट कपात करण्याची विनंती केली होती. केंद्राच्या विनंतीनुसार अनेक भाजपशासित राज्यांनी विमान इंधनावरील व्हॅटमध्ये कपात केली आहे.
अन्य राज्यात विमान इंधनावरील व्हॅट
तामीळनाडू (29 टक्के), राजस्थान (26 टक्के), पश्चिम बंगाल (25 टक्के), दिल्ली, पंजाब (20 टक्के), आसाम (18.65 टक्के), कर्नाटक (18 टक्के) तेलंगणा (16 टक्के), झारखंड (12 टक्के), गोवा (8 टक्के ) गुजरात, जम्मू–कश्मीर, ओडिसा (5 टक्के), मिझोरम, मध्य प्रदेश, बिहार (4 टक्के), दादरा नगर हवेली , दिव आणि दमण (3 टक्के) हिमाचल प्रदेश (2 टक्के) आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर, नागालँड (1 टक्के), मेघालय (0 टक्के)




























































