महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचा महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्राध्यापक सेनेतर्फे ऑनलाइन प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केले. युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, युवासेना सिनेट सदस्य व मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजन कोळंबकर, अध्यक्ष डॉ. धनराज कोहचाडे, महासचिव डॉ. प्रदीप वाघमारे, प्रमुख वक्ते डॉ. संतोष गांगुर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अभिमान गीताने झाली. तर कु. साक्षी ठिक हिने स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र दिन व कामगार दिन समारोहाचे समितीचे समन्वयक व उपाध्यक्ष डॉ. रामकुमार प्रधान यांनी केले.

प्राध्यापकांनी ग्रामीण भागातील उच्च शिक्षणावर विशेष भर द्यावा आणि ही शिक्षणातील असमानता नष्ट करावी. तसेच महाराष्ट्रातील नवीन पिढीची नाळ मातीसोबत घट्ट करावी, अशी अपेक्षा खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी व्यक्त करीत प्राध्यापकांना आपल्याकडून सर्वतोपरी मदत मिळेल, असे आश्वासन देत त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्य वक्पे डॉ. संतोष गांगुर्डे यांनी ‘भारतीय कामगार चळवळीची सद्यस्थिती’ या विषयावर बोलताना कोरोना काळाचा असंघटित कामगारांना मोठा फटका बसल्याचे सांगत असंघटित कामगारांसाठी बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली. शाहीर अमर शेख यांचे नातू शाहीर निशांत शेख यांनी हुतात्म्यांना अभिवादन करणारा पोवाडा गायला. पाहुण्यांचा परिचय प्रा. सागर पटवर्धन, प्रा. आदित्य धायुफुले, प्रा. सोनी जयस्वाल यांनी केला, तर सूत्रसंचालन डॉ. किशोर काजळे यांनी केले. तांत्रिक बाजू डॉ. अतुल रावळ यांनी सांभाळली. आभारप्रदर्शन प्रा. संदीप मोरे यांनी केले, तर मार्गदर्शन महासचिव डॉ. प्रदीप वाघमारे यांनी केले.