दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, वाढीव गुण मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चित्रकला विषयात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत सवलतीचे वाढीव गुण मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास राज्य शिक्षण मंडळाने 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीपर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठवायचे आहेत.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आणि इंटरमिजीएट ही चित्रकला परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. मात्र हे वाढीव गुण विद्यार्थ्यांना मिळणार की नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला होता. इंटरमिजीएट गुणांच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शिक्षण मंडळाने सुरुवातीला 20 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र अद्याप इंटरमिजीएट परीक्षेचा निकालच शाळांकडे आलेला नसल्याने या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांना मुकावे लागण्याची भीती वर्तवण्यात आली होती. सप्टेंबर 2018 इंटरमिजीएट परीक्षा पार पडली. 15 जानेवारीला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर तो पोस्टाने परीक्षा केंद्राकडे येतो. त्यानंतर शाळांकडे येतो, मात्र अद्यापही अनेक शाळांना हा निकाल मिळालेला नाही.

निकाल उशिरा लागत असेल तर शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत वाढीव गुणांचे प्रस्ताव कसे सादर करणार, असा प्रश्न असून ही समस्या दरवर्षीसाठीच होणार असल्याचे मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने निदर्शनास आणून दिले. तसेच दहावीच्या परीक्षेत वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणीही केली. राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही मागणी मान्य करीत वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.