मुंबई, उपनगरात 1 लाख 15 हजार मतदार वाढले

476

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उपनगर जिह्यातील मतदारांच्या संख्येत 1 लाख 15 हजार 590 मतदारांनी वाढ झाली आहे. आता मुंबईच्या उपनगरातील मतदारांची संख्या 72 लाख 63 हजार 249 इतकी झाली आहे. नवीन नोंदणीनुसार यंदा महिला मतदारांच्या संख्येत 1.78 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लोकशाही प्रक्रियेत मतदारांच्या संख्येत वाढ करण्यासासाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने सातत्याने व प्रभावीपणे केलेल्या जनजागृतीमुळे मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मतदारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या 72 लाख 63 हजार 249 एवढी झाली आहे. यामध्ये 39 लाख 47 हजार 385 पुरुष तर 33 लाख 15 हजार 336 महिला आणि 528 इतर मतदारांचा समावेश आहे. या वर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिह्यातील मतदारांच्या संख्येत 1 लाख 15 हजार 590 एवढी म्हणजे 1.62 टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच यानुसार महिला मतदारांच्या संख्येत झालेली वाढ 1.78 टक्के असून पुरुष मतदारांच्या संख्येत 1. 48 टक्के वाढ झाली आहे.

सर्वाधिक मतदार चांदिवलीत

नवीन आकडेवारीनुसार मुंबईच्या उपनगरातील 26 मतदारसंघांपैकी सर्वात अधिक म्हणजेच 3 लाख 79 हजार 279 मतदार हे चांदिवली मतदारसंघात आहेत, तर याखालोखाल गोरेगाव मतदारसंघात 3 लाख 27 हजार 988 आणि अंधेरी (पश्चिम) मतदारसंघात 3 लाख 6 हजार 211 एवढे मतदार आहेत.

सर्वात कमी विक्रोळीत

सर्वात कमी म्हणजे 2 लाख 31 हजार 47 एवढे मतदार विक्रोळी मतदारसंघात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या