एसएससी बोर्ड बंद करणार नाही! विरोधकांच्या आरोपांनंतर शिक्षणमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करताना आपल्या राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्य शिक्षण मंडळ बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेची सर्व जबाबदारी ही राज्य शिक्षण मंडळाकडेच राहणार आहे. नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार, शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांसाठी ब्रिज कोर्सद्वारे अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज सभागृहात निवेदनाद्वारे दिली. सीबीएसई बोर्ड सुरू करताना एसएससी बोर्ड बंद केले जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर आज शिक्षणमंत्र्यांनी निवेदन देत स्पष्टीकरण दिले.

पहिली ते दहावीची पुस्तके एससीईआरटीएम बनवणार

राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुद्याला मंजुरी देण्यापूर्वी तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री यांनी विविध संघटना प्रतिनिधीसोबत चर्चा केली होती. तज्ञ समितीच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम निर्मिती करण्यात आली असून त्याच्या अंतिम आराखडय़ाला राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे तसेच नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीकडून पहिलीचे पाठ्यपुस्तक निर्मितीचे कामकाज सुरू आहे. राज्यासाठी पहिली ते दहावीच्या पाठ्यक्रमाची निर्मिती एससीईआरटीएमकडून केली जात आहे.