
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने निधीची लयलूट केली आहे. एकाच दिवसात 400 कोटी रुपयांहून अधिक निधी सरकारी तिजोरीतून वितरीत करण्यात आला आहे. यात वाईन उद्योगाला प्रोत्साहन म्हणून 17 कोटी रुपये देण्यात आले आहेत. महावीर जयंतीनिमित्त आज सुट्टी होती, पण आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने मंत्रालायाच्या विविध विभागांमध्ये लगबग सुरु होती. वित्त विभागात तर गेल्या दोन चार दिवसांपासून काम सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाच्या आखणीतून मोकळे झाल्यावर लगेच आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी निधी वितरित करण्याचे काम सुरु झाले. कारण 31 मार्चच्या आत निधी खर्च झाला नाही तर विविध विभागांचा निधी व्यपगत (लॅप्स) होईल. त्यामुळे विविध विभागांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यात हातमाग सहकारी महासंघाची प्रलंबित देयके देण्यासाठी सहकारी न्यायालयांच्या कर्मचारी वर्गाचा खर्च, ई गव्हर्नन्स प्रकल्पा अंतर्गत राबवण्यात येणाऱया सेतू महाराष्ट्र, मुख्यमंत्री हेल्पलाईन, मुख्यमंत्री रोजगार निधी, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी निधी देण्यात आला आहे.
राज्याच्या विविध भागातील अतिवृष्टीग्रस्तांच्या योजनांसाठी निधीचे वाटप झाले आहे. रत्नागिरीतील तिवरे धरण फूटून झालेल्या तिवरे गावात मोठे नुकसान झाले होते. या गावातील रस्ते व गटात योजनेसाठी सुमारे 46 लाख 91 हजार रुपयांचा निधी वितरित केला आहे.
मुंबईतील शिवडी किल्ल्याच्या नुतनीकरणासाठी 3 कोटी 41 लाख 51 हजार रुपयांचा, कोल्हापूरमधील चंद्रकांत मांढरे कलासंग्रहालयाच्या नुतनीकरणासाठी 75 लाख 83 हजार रुपये, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात(नागपूर) जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी 4 कोटी 68 लाखांचा निधी दिला आहे. रात्री उशीरापर्यंत निधी वितरणाचे अडीचशेहून अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले.
श्री क्षेत्र भिमाशंकर देवस्थानाला एक कोटी वीस लाख रुपये, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाला साडे सात कोटी रुपये, नांदेड आणि रत्नागिरीतील अतिवृष्टीग्रस्तांना, पोलिस गृहनिर्माण कल्याण महांडळाला निधी वितरित करण्यात आला आहे.




























































