
राज्यातील 19 जिल्ह्यातील 1 हजार 570 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आणि सदस्यपदासाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी केली. या निवडणुकीसाठी 29 मार्च 2020 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी 30 मार्च 2020 रोजी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य सरकारने थेट सरपंच निवड रद्द केली आहे. मात्र, याबाबतचा अध्यादेश काढण्यास राज्यपालांनी नकार दिला आहे. त्यामुळे आयोगाने आधीच्या निर्णयानुसार सरपंचपदासाठी थेट निवडणूक जाहीर केली आहे. एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱया आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 6 ते 13 मार्च 2020 या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. सरकारी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणर नाहीत. अर्जांची छाननी 16 मार्चला होईल तर 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. 29 मार्च रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या दरम्यान मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी 3 अशी राहणार असल्याचे आयोगाने सपष्ट केले आहे.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे -13, रायगड -1, रत्नागिरी -8, नाशिक -102, जळगाव -2, नगर -2, नंदूरबार -38, पुणे -6, सातारा -2, कोल्हापूर -4, संभाजीनगर -7, नांदेड -100, अमरावती -526, अकोला -1 यवतमाळ-461, बुलढाणा -1, नागपूर -1, वर्धा – 3, गडचिरोली – 296






























































