सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटर आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा आहे त्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतो आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाल्याची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यातील ढासळलेली व व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात मंगळवारी मविआच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी वडेट्टीवार बोलत होते.वडेट्टीवार यांनी म्हटले की,  राज्यात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. राज्यात नागपूर, नांदेड, संभाजीनगर, कळवा येथे औषधाविना मोठया प्रमाणात मृत्यू झाले तरी सरकार गाफील आहे. औषधं खरेदीच्या नावाने बोंब आहे. सरकार जनतेचे आरोग्य राखण्यात सपशेल अपयशी ठरली आहे. हे सरकार रुग्णांना 5 रुपयांची गोळी उपलब्ध करून देऊ शकत नाही, यामुळे रुग्णांचा जीव वाचवू शकत नाही याची खंत वाटते. राज्याची आरोग्य व्यवस्था गॅस वर असून याला सर्वस्वी सरकार, आरोग्यविभाग जबाबदार असल्याचा आरोप करत जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारची या अधिवेशनात स्टेथस्कोप घेऊन तपासणी करणार अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आरोग्य व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, अशोक चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले.