
देशात सर्वाधिक साप चावण्याची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. तसेच देशात सर्वाधिक साप चावण्याच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. परंतु महाराष्ट्रात साप चावून मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे.
मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका संशोधनानुसार 2018-19 या काळात महाराष्ट्रात साप चावण्याच्या 42 हजार 26 घटना घडल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 36 हजार 858 घटना घडल्या आहेत. तसेच धक्कादायक बाब म्हणजे जगात साप चावल्याने जेवढे मृत्यू होतात, त्यातील अर्धे मृत्यू हे हिंदुस्थानात होतात, असे अहवालात नमूद केले आहे.
2017-18 नुसार महाराष्ट्रात प्रयेक एक लाख लोकसंख्येमागे 32 जणांना साप चावला आहे. पश्चिम बंगालमध्ये हे प्रमाण 36 इतके होते. 2018-19 मध्ये हे प्रमाण वाढून महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 35 जणांना साप चावले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 39 जणांना साप चावले आहेत.
इतर राज्यांच्या तुलनेत साप चावल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. राज्यात 14 जिल्ह्यात साप चावण्याचे प्रमाण अधिक आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 12 जिल्ह्यांमध्ये साप चावण्याचे प्रमाण अधिक आहे. 2018-19 काळात नाशिक जिल्ह्यात 4 हजार 294 साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पश्चिम बंगालमधील पुर्बा मेदिनीपूरमध्ये सर्वाधिक म्हणजे 4 हजार 904 साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात पश्चिम घाटाचे विस्तीर्ण जंगल पसरले आहेत. तसेच नाशिकमधील द्राक्ष बागायती, ऊस बागायतींमुळे सापांचे प्रमाण वाढले आहे. 2018-19 मध्ये पालघर जिल्ह्यात 3 हजार 24, ठाणे जिल्ह्यात 2 हजार 655, कोल्हापुरात 2 हजार 298, पुण्यात 2 हजार 102, रत्नागिरी 1 हजार 1994 तर जळगाव जिल्ह्यात 1 हजार 842 साप चावण्याच्या घटना घडल्या आहेत.































































