
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. दरम्यान, राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती किती विदारक झाली आहे, याचा प्रत्यय हिंगोलीतील एका शेतकऱ्याच्या पत्रामुळे आला आहे. आपल्या पिकाची नुकसान भरपाई मागण्यासाठी या शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय कोणताही मार्ग उरणार नाही, अशी आर्त विनवणी या पत्रातून करण्यात आली आहे.
हिंगोलीच्या गजानन नारायण अवचार या शेतकऱ्याने 23 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे. अवचार हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या सपतगाव इथले रहिवासी आहेत. त्यांची एका हेक्टरवर डाळिंबांची शेती आहे. पण, कोरोना महामारीच्या तडाख्यानंतर त्यांना डाळिंबांची विक्री करण्यात अडचणी आल्या. त्यानंतर सलग दोन वर्षं पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्यांचं सुमारे 50 लाखांचं नुकसान झालं आहे. त्यात त्यांच्यावर एका बँकेचं पाच लाख तर एका आर्थिक संस्थेकडचं 15 लाख असं एकूण 20 लाख रुपयांचं कर्ज आहे.
आपल्या कुटुंबात पाच सदस्य असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आता आपल्याकडे कोणतंही साधन नाही. त्यात कर्जाच्या हप्त्यांसाठी बँकेकडून नोटीस येत असून ते फेडू न शकल्याने आपण मानसिक तणावात आहोत. त्यामुळे आता आपली सगळी भिस्त ही सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर असून ती न मिळाल्यास आपल्याला आत्महत्या करण्याखेरीज अन्य पर्याय शिल्लक राहणार नाही, अशी विनवणी अवचार यांनी आपल्या पत्रात केली आहे. 24 जुलै रोजी मुख्यमंत्री सचिवालयात हे पत्र प्राप्त झालं असल्याचं वृत्त आहे.



























































