
दंगलगर्ल गीता आणि बबिता या फोगाट भगिनीप्रमाणेच यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या 63 व्या पर्वात आबासाहेब आणि ज्योतिबा या अटकळे बंधूंनी मोठा पराक्रम केला. आबासाहेब व ज्योतिबा या दोन्हीही मराठमोळ्या मल्लांनी 57 किलो गटात अनुक्रमे माती व गादी विभागात आखाडा गाजवला. आबासाहेबने शुक्रवारी सुवर्णपदकाची कमाई केली, तर अंतिम फेरीत धडक दिलेला ज्योतिबा उद्या म्हणजे शनिवारी सुवर्णपदकाच्या लढतीमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील (जि. सोलापूर) शेगाव धुमाला या छोटय़ाशा खेडेगावातील हे सख्खे भाऊ पक्के मल्ल बनले आहेत. अडकळे बंधूचे वडील बजरंग स्वतः कुस्तीपटू होते. घरातूनच कुस्तीचा वारसा लाभलेले आबासाहेब व ज्योतिबा यांनी काही काळ गावाकडेच वस्ताद मारुती माळी यांच्याकडे कुस्तीचे धडे गिरवले. त्यानंतर पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात तयार झालेले हे काका पवार यांचे पठ्ठे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये कौशल्य पणाला लावत आहेत. आबासाहेब सहाव्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी झाला असून ज्योतिबाची ही पाचवी वेळ आहे. आबासाहेबने या मानाच्या स्पर्धेत तीन रौप्य व एकदा कास्यपदक जिंकलेले आहे, तर ज्योतिबाने दोन सुवर्ण, एक रौप्य व दोन कास्यपदकांची कमाई केलेली आहे.




























































