
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील धुमसत्या संघर्षामुळे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आटोपते घेण्याचा विचार सुरू आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मुंबई शहराला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून या स्थितीत अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस अडकून पडतात. त्यामुळे उद्याच लेखानुदान मंजूर करून अधिवेशन गुंडाळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शनिवारपर्यंतचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. सीमेवरील संघर्षामुळे देशातील प्रमुख शहरांत व विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लष्कर व तटरक्षक दलाबरोबरच पोलिसांवरही सर्व प्रमुख ठिकाणांच्या बंदोबस्ताची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जायसवाल यांनी आज विधान भवनात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
अधिवेशनामुळे विधान भवन परिसरात मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. शिवाय अधिवेशन काळात येणाऱ्या मोर्चांमुळे आझाद मैदान परिसरातही मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतो. पाच ते सहा हजार पोलीस यात अडकून पडतात. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्री देकेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्व पक्षांच्या गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी सद्य परिस्थितीबाबत माहिती दिल्यानंतर विधिमंडळाचे अधिवेशन लवकर संपवण्याबाबत चर्चा झाली. गुरुवारी सकाळी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार असून या बैठकीत अधिकेशन गुंडाळण्याबाबत निर्णय होणार आहे.

























































