शो मस्ट गो ऑन! निर्बंधामुळे मराठी मालिकांचे काही दिवस परराज्यात शूटिंग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस राज्यामध्ये जनतेच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. चित्रपट-मालिकांच्या शूटिंगवरही बंदी घातली आहे. निर्बंधाच्या काळात प्रेक्षकांनी घरीच सुरक्षित राहावे आणि या काळात त्यांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत पुढील काही दिवस मराठी मालिकांचे शूटिंग बेळगाव, गोवा, सिल्वासा, जयपूर आदी ठिकाणी होणार आहे.

निर्बंधांमुळे घरी असलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘झी मराठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ या वाहिन्यांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये जुन्या मालिका पुनर्पसारित करण्यात आल्या होत्या. आता मात्र प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहता यावेत यासाठी वाहिन्यांनी मालिकांचे शूटिंग काही दिवस परराज्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘झी मराठी’वरील ‘पाहिले न मी तुला’ आणि ‘अग्गंबाई सूनबाई’चे शूटिंग गोव्यात होणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे शूटिंग जयपूरला तर ‘देवमाणूस’चे बेळगावला पार पडणार आहे. ‘माझा होशील ना’ मालिकेचे शूटिंग सिल्वासाला तर ’होम मिनिस्टर’चे शूटिंग घरच्या घरी पार पडणार आहे.

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘रंग माझा वेगळा’चे शूटिंग गोव्यात होणार आहे. तर ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘सांग तू आहेस ना’चे शूटिंग सिल्वासाला होणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिका अहमदाबादमध्ये चित्रीत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या