आरे दुधावरील कमिशन, वाहतूक दर वाढवा, महाराष्ट्र दूध वितरक सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे हॉटेल्स, चहा स्टॉल आणि रुग्णालयांमधील दुधाच्या मागणीत घट झाली आहे. त्यात इंधनवाढ झाली असल्यामुळे आरे दूध विक्रेते आणि वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे आरे दुधावरील कमिशन प्रति लिटर 6 रुपये करावा आणि संस्था-रुग्णालये यांचा सरसकट वाहतूक दर प्रति लिटर 3 रुपये करावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आणि बृहन्मुंबई दूध योजनेचे व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई दूध योजनेच्या दैनंदिन दूध वितरणामध्ये 2020-2021 या कालावधीमध्ये प्रचंड घट झाली आहे. आरे दूध विक्री केंद्रांना सकाळी 6 ते 11, त्यानंतर सायंकाळी 4 यादरम्यान दूध विक्रीला परवानगी आहे. हॉटेल, चहा स्टॉल बंद असल्यामुळे दुधाची मागणी कमी झाली आणि रुग्णालयांनी दुधाच्या मागणीमध्ये कपात केली. यामुळे आरे केंद्रधारकाचे आर्थिक नुकसान झाले. त्यांची उपजीविका संकटात आली आहे. कोरोनामुळे व इंधनाच्या जागतिक धोरणामुळे डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. वाहन खर्च, कर्मचारी पगार व इतर खर्च सांभाळणे आर्थिकदृष्टय़ा फार कठीण झाले आहे. त्यामुळे आरे केंद्रधारक व वाहतूकदार यांना आर्थिक दिलासा देण्याकरिता दैनंदिन दूध विक्री कमिशन प्रतिलिटर 6 रुपये करावे आणि संस्था-रुग्णालये यांना दूध वितरण करण्यासाठीचा वाहतूक दर 3 रुपये करावा असे स्पष्ट करत आरे वितरक व वाहतूकदार आर्थिक अडचणीत असल्यामुळे प्रशासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त आणि बृहन्मुंबई दूध योजनेचे व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे.