जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला, सभागृहात एकच हशा

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय खडाजंगी पाहायला मिळेल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात होती. कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच त्याचा प्रत्यय आला! कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आणि सभागृहात एकच हशा पिकला.

विधानसभेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्यास सांगितले. त्यानुसार शिंदेंनी जागेवर उभं राहात नव्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करण्यास सुरुवात केली. शिंदेंनी पहिलाच परिचय अजित पवार यांचा केला. त्यावर विरोधी बाकांवरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

शिंदेंनी अजित पवारांचा “उपमुख्यमंत्री व वित्त” असा परिचय केला. यावेळी त्यांनी थांबून पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. यावेळी शेजारीच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असं म्हटलं. यानंतर शिंदेंनी नववचा उल्लेल्ख केला.

यानंतर अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. यावेळी विरोधी बाकांवर बसलेल्या जयंत पाटलांनी त्यांना टोला लगावला. “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, असं जयंत पाटील म्हणताच सभागृहात हशा पिकला. यावेळी अजित पवार यांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले.