महाराष्ट्रात आता निवडणूक तापू लागली; आघाडी आणि युतीसाठी वाटाघाटी, कमळाबाई आणि मिंध्यांची बैठक

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची सोमवारी घोषणा होताच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आघाडी आणि युतीच्या वाटाघाटीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांच्या जोरबैठका सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मिंधे गटाच्या मुंबईतील नेत्यांची प्राथमिक बैठक मुंबईत झाली. मिंधे गटाने मुंबईत 125 जागा मिळाव्यात असा आग्रह कमळाबाईकडे धरला आहे, तर भाजपने 150 हून अधिक जागांवर दावा केला आहे. या बैठकीचे अजित पवार गटाला आमंत्रण नव्हते.

भाजप मुंबई कार्यालयात पालिका निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक पार पडली. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी मंत्री आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर तर शिंदे गटाकडून गृह राज्यमंत्री सिद्धेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे उपस्थित होते. या बैठकीत महायुतीचे जागावाटप, निवडणूक प्रचाराची रणनिती यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. एक-दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन वॉर्डनिहाय कोण कुठे लढणार याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

150 प्लस जागा जिंकण्याचे लक्ष्य – आशीष शेलार

महायुतीत कोण किती जागा लढणार यावर भाजप आणि मिंधे गटाच्या नेत्यांत अद्याप एकमत झालेले नाही, मात्र मंत्री आशीष शेलार यांनी महायुती म्हणून मुंबईत 150 प्लस नगरसेवक निवडून आणणे हे आमचे लक्ष्य असल्याचे शेलार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

मुंबईत अजित पवार गट महायुतीत नाही

नवाब मलिक हे मुंबईत अजित पवार गटाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही युती करू शकत नाही. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे हे मला भेटले होते. मलिक असतील तर अजित पवार गट मुंबईत महायुतीत नसेल, असे आम्ही त्यांना सांगितल्याचे शेलार म्हणाले.

शिंदे गटाला 52 जागा देण्याची तयारी

महायुतीच्या आजच्या बैठकीत दोन्ही पक्षांकडे असलेल्या विद्यमान नगरसेवकांच्या जागा त्यांच्याकडेच ठेवण्यावर एकमत झाले. त्यानुसार भाजपने शिंदे गटाला 52 जागा देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिंदे गटाचे आमदार असलेल्या भागात एखाद् दोन अधिकच्या जागा अशा जेमतेम 70 ते 75 जागा महायुतीच्या अंतिम वाटाघाटीत दिल्या जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची वेगळी चर्चा

नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवार गटाची स्वतंत्र बैठक झाली. यामध्ये मुंबईत काय करता येईल याबाबत चाचपणी करण्यात आली. यामध्ये किमान 50 जागा लढण्याची तयारी त्यांनी केली असून महायुतीत राहायचे की नाही याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील असे ठरविण्यात आले.

तटकरे-पटेल दिल्लीत शहांना भेटले

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. शक्य असेल त्या ठिकाणी महायुती करून लढण्याच्या सूचना शहा यांनी त्यांना दिल्या.