धक्कादायक! महाराष्ट्रात निर्भया फंडाचा शून्य वापर; केंद्राने दिले होते 2,264 कोटी

392
फोटो- प्रातिनिधिक

महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांसाठी देण्यात आलेल्या निर्भया निधीचा महाराष्ट्रात शून्य वापर करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तर राज्यांना देण्यात आलेल्या या निधींपैकी 90 टक्के निधीचा वापर झालेला नाही. केंद्र सरकारने निर्भया फंडअंतर्गत 2,264 कोटी दिले होते. त्यापैकी 252 कोटींचा वापर झाला आहे.

देशात विविध राज्यांत तरुणींवर बलात्कार, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे समोर येत असताना या निधीचा वापर महिलांच्या सुरक्षेसाठी न होणे हे धक्कादायक आहे! दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर या निधीची सुरुवात झाली होती. महाराष्ट्र निधी वापरण्याच्या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने 2017 मध्ये दिलेल्या अहवालात महाराष्ट्र हे राज्य महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या बाबतीत दुसऱया स्थानावर आहे. तरीही महाराष्ट्रातील सरकारने या निधीचा वापर केलेला दिसत नाही.

29 नोव्हेंबर रोजी लोकसभेत महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार, उत्तराखंड आणि मिझोराम या छोटय़ा राज्यांनी एकूण निधीपैकी 50 टक्के निधी वापरल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर छत्तीसगड (43 टक्के), नागालँड (39 टक्के) आणि हरयाणा (32 टक्के) या राज्यांनी निधी वापरला आहे. देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी अवघ्या चार राज्यांनी सर्वाधिक निधी वापरला आहे. तर 15 टक्क्यांपेक्षा अधिक निधी 18 राज्यांनी वापरला आहे.

महिलांविरोधातील गुन्हेगारीबाबत बदनाम असलेल्या दिल्लीने फक्त 5 टक्के निधी वापरला आहे. कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणामध्ये या निधीचा अवघा 6 टक्के वापर झाला आहे. तर सतत महिलांवर अत्याचाराचे गुन्हे घडत असलेल्या उत्तर प्रदेशात 21 टक्के निधी वापरला.

आपली प्रतिक्रिया द्या