
सध्याच्या काळात देशभरात प्रत्येक गल्लीबोळात आज क्यूआर कोड आणि यूपीआय पेमेंटची सुविधा पाहायला मिळते. यूपीआयच्या माध्यमातून दरमहा 20 अब्जांहून अधिक व्यवहार होत असून देशातील एकूण डिजिटल पेमेंटमध्ये यूपीआयचा वाटा सुमारे 85 टक्के आहे. या सुविधेचा वापर महाराष्ट्रात अग्रस्थानी आहे, तर बिहार राज्य पिछाडीवर आहे, असे एका अहवालातून दिसून आलेय.
नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यांच्या लोकसंख्येनुसार प्रति व्यक्ती यूपीआय वापराचे विश्लेषण केल्यास मोठी तफावत दिसून येते. महाराष्ट्रातील एक सरासरी व्यक्ती बिहारमधील व्यक्तीच्या तुलनेत सात पट अधिक यूपीआय व्यवहार करते. सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्रात प्रति व्यक्ती मासिक व्यवहारांची सरासरी 17.4 इतकी आहे, तर याउलट बिहार आणि त्रिपुरासारख्या राज्यांत हा आकडा प्रति व्यक्ती 4 व्यवहारांपेक्षाही कमी आहे.
महाराष्ट्रातील शहरांमध्ये छोटय़ा दुकानांतही क्यूआर कोडची स्वीकारार्हता अत्यंत जास्त आहे, तर बिहारच्या ग्रामीण भागात आजही रोख व्यवहार हेच देवाणघेवाणीचे मुख्य साधन बनलेले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणापर्यंतचा भाग डिजिटलदृष्टय़ा मॅच्युअर झाला असून येथील लोक आता अगदी लहान व्यवहारांसाठीही रोख रकमेचा वापर जवळ जवळ बंद करत आहेत.
डिजिटल वापरात पूर्वेकडील राज्ये बरीच मागे दिसत आहेत. झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये प्रति व्यक्ती वापर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. त्रिपुरामध्ये तर स्थिती अधिक चिंताजनक असून तिथे प्रति व्यक्ती व्यवहाराचे मूल्य केवळ 5,100 रुपयांच्या आसपास आहे.
दिल्लीमध्ये यूपीआयला चांगला प्रतिसाद
लहान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केल्यास दिल्ली या शर्यतीत सर्वात पुढे आहे. दिल्लीमध्ये प्रति व्यक्ती दरमहा सरासरी 23.9 व्यवहार होतात. त्या पाठोपाठ गोवा (23.3), तेलंगणा (22.6) आणि चंदिगड (22.5) यांचा क्रमांक लागतो. जिथे शहरीकरण अधिक आहे आणि व्यावसायिक सेवा अधिक आहेत, तिथले लोक मोबाईलने पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत.



























































