
गरीब आणि गरजू महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ आहे. पण त्या योजनेचा लाभ 14 हजार 298 पुरुषांनीही घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पुरुष लाभार्थींनी या योजनेचे दरमहा दीड हजार रुपये असे दहा महिने पैसे घेतले. त्यामुळे राज्याच्या तिजोरीला 21 कोटी 44 लाख रुपयांचा फटका बसला आहे.
‘लाडकी बहीण योजने’त 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये सरकारकडून दिले जातात. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार आल्याने इतर योजनांना कात्री लावण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. परंतु महिला व बालविकास विभागाने नुकत्याच केलेल्या छाननीमध्ये 14 हजार 298 पुरुषांनी आपण महिला असल्याची नोंदणी करून या योजनेचे पैसे मिळवल्याचे समोर आले. त्यांच्या खात्यातील पैसे तातडीने रोखण्यात आले आहेत.
सरकारला फसवणाऱ्यांचा बंदोबस्त मुख्यमंत्रीच करतील – आदिती तटकरे
सध्या 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांना मिळणारे फायदे थांबवण्यात आले आहेत आणि सुमारे 2.25 कोटी लाभार्थी पात्र आहेत. सरकारची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे स्वरूप मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ठरवले जाईल, असे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
सक्तीने पैसे वसूल करणार – अजित पवार
‘लाडकी बहीण योजने’त अनेक अपात्र महिलांनीही पैसे घेतले होते. त्यांना योजनेतून वगळण्यात येईल, पण त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत अशी भूमिका सरकारने घेतली होती. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून मात्र सर्व पैसे वसूल केले जातील आणि दिले नाहीत तर कठोर कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.